म न पा आयुक्त मनिषा खत्रीनी केली मैदानाची पाहणी आणि तयारीचा शुभारंभ
नाशिक , 15 जानेवारी (हिं.स.)।- नाशिक मध्ये २३ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय - तर्फे महाराष्ट्र विरुद्ध वडोदरा हा चार दिवसीय रणजी ट्रॉफी सामना हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे होत आहे.
या सामन्याच्या तयारी साठीच्या कामाचा शुभारंभ नाशिक म न पा आयुक्त माननीय मनिषा खत्री यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या प्रसंगी माननीय आयुक्तांनी सामन्याची खेळपट्टी, पॅव्हेलियन हॉल , दोन्ही संघांच्या ड्रेसिंग रूम्स व मैदानातील इतर सोयी सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले आणि सामन्यासाठी नाशिक म न पाचे संपूर्ण सहकार्य मिळेल याची ग्वाही दिली.
याप्रसंगी आयुक्तांसमवेत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी चेअरमन विलास भाऊ लोणारी , विद्यमान चेअरमन धनपाल ( विनोद ) शहा, शहर अभियंता संजय अग्रवाल, सचिन जाधव, नितीन राजपूत, सहसचिव योगेश मुन्ना हिरे व चंद्रशेखर दंदणे, सेक्रेटरी समीर रकटे , खजिनदार हेमंत देशपांडे, संघटनेचे पदाधिकारी राघवेंद्र जोशी, निखिल टिपरी , शिवाजी उगले, बाळासाहेब मंडलिक , महेश मालवी, हेतल पटेल असे आजी व माजी कार्यकारिणी सदस्य तसेच तीन निवड समिति सदस्य सतीश गायकवाड, तरुण गुप्ता व फय्याज गंजीफ्रॉकवाला उपस्थित होते.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे ,एकूण दोन दशकांच्या खंडानंतर डिसेम्बर २००५ च्या महाराष्ट्र विरुद्ध तामिळनाडू आयोजित सामन्यापासून , डिसेम्बर २०१८ पर्यंत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने एकूण दहा सामन्यांच्या नियोजनाचा धडाका लावला होता. यादरम्यान अलीकडच्या काळात अनेक दिग्गज खेळाडू नाशिकला आपल्या कौशल्याची , उच्च दर्जाच्या खेळाची चुणूक दाखवून गेले. रोहित शर्मा असो वा मुरली विजय या दोघांनाही भारतीय संघातील समावेशाची खुशखबर हुतात्मा अनंत कान्हेरे मैदाना वरील सामना खेळत असतानाच मिळाली. महाराष्ट्राच्या हृषीकेश कानिटकर पासून सौराष्ट्रच्या जयदेव उनाडकट पर्यंत व अजून काही काही नामवंत खेळाडूंची नावे सांगायची झाल्यास - दिनेश कार्तिक,मुनाफ पटेल , बालाजी, आकाश चोप्रा , कुलदीप यादव, निलेश कुलकर्णी , पार्थिव पटेल, अभिनव मुकुंद, उमेश यादव , इरफान पठाण, एस श्रीराम ,सुरेश रैना , अजित आगरकर आणि अर्थातच सर्व महाराष्ट्राचा लाडका केदार जाधव.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI