ठाणे, 15 जानेवारी (हिं.स.)। भारताचे पंतप्रधान पद तीन वेळा भुषविणाऱ्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आर्थिक आघाडीवर मोठे काम केले, किंबहुना अटलजींच्या द्रष्टेपणामुळेच भारतात कम्युनिकेशनची आर्थिक ई क्रांती झाली. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध पत्रकार आणि लेखक सारंग दर्शने यांनी केले.
ठाण्याच्या सरस्वती क्रीडा संकुल पटांगणात आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातुन सुरू असलेल्या ३९ व्या कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत सारंग दर्शने यांनी 'अटलजींचा वसा आणि वारसा' हे सहावे पुष्प गुंफले. यावेळी व्यासपीठावर या सत्राचे अध्यक्ष शरद गांगल, अध्यक्ष ठाणे जनता सहकारी बँक, सुहास जावडेकर उपस्थित होते.
लेखक दर्शने यांनी, अटलजींच्या चरित्राचे पैलु उलगडताना संघाचे प्रचारक, जनसंघ ते पंतप्रधान पदापर्यतचा प्रवास श्रोत्यांसमोर मांडला. १९५० चे दशक ते १९७७ पर्यतचा काळ बिकट होता. समाजात उद्योजकतेला स्थान मिळत नव्हते. जागतीक अर्थव्यवस्थाही दोलायमान स्थितीत होती. जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बनलेल्या अटलजींनी त्याही वातावरणात देशाची प्रतिमा उंचावण्याचे कार्य केले. १९८५ - ८६ नंतर भारतीय जनता पक्षामध्ये गांधीवादी समाजवाद मागे पडत गेल्याचे सांगुन दर्शने यांनी, अटलजींच्या प्रतिभाशाली राजकिय कारकिर्दीवर प्रकाश टाकला. १९९६, १९९८ आणि १९९९ असे तीन वेळा अटलजींनी पंतप्रधान पद भुषविले. त्यांच्या कारकिर्दीमध्येच भारताने आर्थिक आघाडीवर मोठे काम केले. कम्युनिकेशनचे खाते स्वतःकडे घेत अटलजींनी कम्युनिकेशनचे ब्रिटीशकालीन कायदे बदलुन दुरसंचार धोरणात आमुलाग्र बदल केले. अटलजींच्या या द्रष्टेपणामुळेच भारतात कम्युनिकेशनची आर्थिक ई क्रांती झाली. ज्यामुळे देशातील १०० कोटी जनता आज ई पेमेंटचा वापर करीत असुन त्याचा पदोपदी प्रत्यय येत असल्याचे दर्शने यांनी सांगितले.
नेतृत्वाचा कस लागणारे अनेक निर्णय अटलजींनी घेतले. ज्यात बुद्ध पुन्हा हसला या अणुस्फोटाच्या धाडसी निर्णयाचा समावेश आहे. अणुचाचण्यांपासून ते अंतराळ मोहिम आणि शैक्षणिक सुधारणांपर्यंतचे अनेक निर्णय घेतल्याने भारताची महासत्ता बनण्याकडे वाटचालीचा पाया रचला गेला. किमान समान कार्यक्रम राबवताना अटलजींनी पक्षाच्या धोरणांचा कधीच विसर पडु दिला नाही. अटलजींकडे पूर्ण बहुमत असते तर देशात समान नागरी कायदा कधीच पारित झाला असता, असे स्पष्ट करताना दर्शने यांनी अटलजींच्या नेतृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक गोष्टी विषद केल्या. राजकारणापेक्षा कवी म्हणून चांगली कारकिर्द केली असती, डॉक्टरेट करायची राहुन गेली आणि अध्यापन क्षेत्रात काम करणे राहुन गेल्याची खंत देखील अटलजींनी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. अशा कवी, राजकारणी आणि दूरदृष्टी असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांचा भारतीय जनता पक्षाच्याच नव्हे तर भारताच्या वाटचालीवर पुढील किमान ५० वर्षे प्रभाव राहिल. असेही दर्शने यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर