ठाणे, 15 जानेवारी (हिं.स.)।दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सच्या ठाणे केंद्रातर्फे २४ आणि २५ जानेवारी रोजी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात महाराष्ट्र आणि गोव्यातील वास्तुविशारद यांचे राज्य अधिवेशन - महाकॉन २५ आणि पश्चिम प्रादेशिक परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स ठाणे सेंटरचे अध्यक्ष आणि महाकॉन २५ चे संयोजक वास्तुविशारद मकरंद तोरसकर आणि दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष वास्तुविशारद संदीप प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या परिषदेला पश्चिम विभागातील सर्व वास्तुविशारद उपस्थित राहणार आहेत. या वर्षीच्या परिषदेचा विषय `अॅडॅप्टिव्ह रीयूज आणि पॅरामेट्रिक आर्किटेक्चरचा संगम (कॉन्फ्युअन्स)' हा असून जो नवीन युगातील तंत्रज्ञान आणि शाश्वततेच्या दृष्टिकोनातून वास्तुकला पद्धतीकडे पाहतो. परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध वास्तुविशारदांचे सादरीकरण व चर्चा होणार आहे.
झाहा हदीद आर्किटेक्ट्स (लंडन) चे वास्तुविशारद (वा.वि.) जोहान्स शॅफेलनर, स्टुडिओ इमर्जन्सच्या वा.वि. खुशबू दावडा, प्ले आर्किटेक्चरचे वा.वि. सेंथिल कुमार दॉस, स्टुडिओ आर्डेटचे वा.वि. बद्रीनाथ कालेरू आणि BNCA च्या डीन प्रो. वा.वि. धनश्री सरदेशपांडे हे पॅरामेट्रिक आर्किटेक्चरसाठी अतिथी वक्ते आणि पॅनेल सदस्य असतील. SNK कन्सल्टंट्सच्या वा.वि. ब्रिंदा सोमया आणि वा.वि. नंदिनी सोमया संपत, द्रोणा आर्किटेक्ट्सच्या डॉ. शिखा जैन, वा.वि. किर्तीदा उनवाला, KGA चे वा.वि. इशान करण ग्रोव्हर हे अॅडॅप्टिव्ह रीयूजवर त्यांचे विचार मांडतील. आयआयए ठाणे सेंटरने IES आर्किटेक्चर कॉलेजच्या सहकार्याने `The P-Pod' या डिझाइन आणि बिल्ड स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यातील अंतिम स्पर्धकांनी तयार केलेल्या रचना कार्यक्रमस्थळी प्रदर्शित केल्या जातील. २५ तारखेला सकाळी उपवन तलावावर उपस्थितांसाठी स्केचिंग, ड्रमिंग, फोटोग्राफी आणि कविता वाचनाचा कार्यक्रम `Fun at Upvan' आयोजित केला जाणार आहे.
ठाणेकरांना समाजातील वास्तुविशारदांच्या भूमिकेबद्दल जागरूक करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आर्किटेक्चरमधील अभ्यासक्रमांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी दोन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे आणि त्यासोबतच बांधकाम उद्योगाशी संबंधित विविध कंपन्यांचे स्टॉल्स देखील उभारण्यात येतील. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.
या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे `देऊळ कथन' हे कोकण आणि गोव्यातील प्राचीन मंदिरांच्या दस्तऐवजीकरणावरील प्रदर्शन आहे, जे IES आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे.
-------------------------
`आम्ही सर्व उत्साही ठाणेकरांना प्रदर्शनाला भेट देण्याचे आणि वास्तुविद्या या क्षेत्रातील करिअर संधींबद्दल माहिती मिळविण्याचे आवाहन करतो. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत - मकरंद तोरसकर
-----------------------
`एक अभिमानी ठाणेकर म्हणून, मी खूप आनंदी आहे आणि महाकॉन २५ च्या यशस्वी आयोजनासाठी उत्सुक आहे,' - संदीप प्रभू
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर