मुंबई , 17 जानेवारी (हिं.स.)।न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये भारताला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर भारतीय बोर्डाने खेळाडूंसाठी कठोर नियमांचे अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे. बीसीसीआयने भारतीय संघांसाठी नवीन नियमावली जारी केली आहे.तसेच सर्व खेळाडूंना हे नियम पाळणे बंधनकारक आहेत.जे खेळाडू नियम मोडतील, त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
* बीसीसीआयने टीम इंडिया साठी लागु केले १० नियम
१. भारतीय खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य करण्यात आले आहे. भारतीय संघातील खेळाडूंची निवडही यावर आधारित असेल.जर एखाद्या खेळाडूला कोणत्याही कारणास्तव देशांतर्गत क्रिकेट खेळायचे नसेल तर त्याला बीसीसीआयला त्याबद्दल माहिती द्यावी लागेल.
२. प्रत्येक खेळाडूला संघासोबत प्रवास करावा लागेल असा कडक नियमही करण्यात आला आहे. याचा अर्थ खेळाडू त्यांच्या कुटुंबियांसोबत प्रवास करू शकणार नाहीत. जर या नियमाचे उल्लंघन झाले तर कठोर शिक्षा दिली जाईल. जर त्याला त्याच्या कुटुंबासह किंवा स्वतंत्रपणे प्रवास करायचा असेल तर त्याला मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीच्या अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागेल.
३. दौऱ्यावर असताना कोणताही खेळाडू जास्तीचे सामान घेऊन जाऊ शकणार नाही. परदेशातील ३० दिवसांपेक्षा अधिक, ३० दिवसांपेक्षा कमी आणि देशांतर्गत स्पर्धेनुसार सामानाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ दोघांसाठी हा नियम असेल.
४. प्रत्येक खेळाडूला बंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्सला सामान किंवा वैयक्तिक वस्तू पाठवण्यासाठी संघ व्यवस्थापनाशी संपर्क साधावा लागेल. जर एखादी वस्तू वेगळ्या पद्धतीने पाठवली गेली, तर होणारा अतिरिक्त खर्च खेळाडूला करावा लागेल.
५. वैयक्तिक कर्मचाऱ्यांना (जसे की वैयक्तिक व्यवस्थापक, स्वयंपाकी, सहाय्यक आणि सुरक्षा) कोणत्याही दौऱ्यात किंवा मालिकेत सहभागी होण्यास बंदी घातली जाईल. जोपर्यंत यासाठी बीसीसीआयची परवानगी घेतली जात नाही.
६. प्रत्येक खेळाडूला सराव सत्रादरम्यान उपस्थित राहावे लागेल. कोणताही खेळाडू सराव सत्र लवकर सोडू शकणार नाही. मालिका किंवा स्पर्धेदरम्यान, तुम्हाला संघासोबत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करावा लागेल.
७. खेळाडूंना यापुढे मालिका आणि वेगवेगळ्या दौऱ्यांदरम्यान वैयक्तिक शूटिंग आणि जाहिरातचे शूटिंग करू शकणार नाही. खेळाडूंचे लक्ष दुसरीकडे जाऊ नये म्हणून बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
८. जर एखादा खेळाडू 45 दिवसांसाठी परदेश दौऱ्यावर राहिला तर त्याची पत्नी आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे मूल त्याच्यासोबत मालिकेत दोन आठवडे राहू शकते. या काळात, त्यांच्या राहण्याचा खर्च बीसीसीआय करेल परंतु उर्वरित खर्च खेळाडूला करावा लागेल.
तसेच, कुटुंबाला भेटायचे असल्यास कोचं किंवा कर्णधारची परवानगी घ्यावी लागणार.
९. जेव्हा जेव्हा बीसीसीआयचा अधिकृत शूट, प्रमोशन किंवा इतर कोणताही कार्यक्रम असेल तेव्हा प्रत्येक खेळाडूला त्यात सहभागी व्हावे लागेल.
१०. प्रत्येक खेळाडूला दौऱ्याच्या शेवटपर्यंत संघासोबत राहावे लागेल. मालिका लवकर संपली तरी खेळाडूला संघासोबत राहावे लागेल.
बीसीसीआयने म्हटले आहे की सर्व खेळाडूंनी वरील मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित आहे. जर एखाद्या खेळाडूला यापैकी कोणत्याही गोष्टींचे पालन करता येत नसेल तर त्याला निवड समितीचे अध्यक्ष आणि मुख्य प्रशिक्षक यांची परवानगी घ्यावी लागेल. याशिवाय, जर कोणताही खेळाडू यामध्ये चूक करताना आढळला तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. तसेच जर एखाद्या खेळाडूने या धोरणांचे योग्य पालन केले नाही तर बोर्ड त्याला टूर्नामेंट, मालिका आणि अगदी आयपीएलमध्ये खेळू देणार नाही. याशिवाय बोर्ड खेळाडूंचे वेतन आणि करारही संपुष्टात आणू शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode