ढाका, 1 जुलै, (हिं.स.) भारतीय
क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा अडचणीत सापडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला बांग्लादेशमध्ये
जाण्यासाठी भारत सरकारकडून परवानगी मिळालेली नाही. बांगलादेश क्रिकेट मंडळाने ऑगस्टमध्ये होणाऱ्या मालिकेसाठी बीसीसीआयशी 'सकारात्मक चर्चा' सुरू असल्याचे म्हटले आहे. टीम इंडिया १७ ऑगस्टपासून ३ एकदिवसीय
सामन्यांची आणि तितक्याच टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. बीसीबीचे अध्यक्ष
अमिनुल इस्लाम अजूनही या मालिकेबद्दल सकारात्मक आहेत. दरम्यान,
ही मालिका अनिश्चित असल्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे क्रिकेटच्या
मैदानावरील पुनरागमन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या दोघांनी कसोटी आणि टी-२०
क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर रोहित-विराट आता केवळ एकदिवसीय सामनेच खेळणार
आहेत.
बांग्लादेशच्या शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियममध्ये
झालेल्या १९ व्या बोर्ड बैठकीनंतर अमिनुल यांनी माध्यमांना सांगितले की, आमची बीसीसीआयशी सकारात्मक चर्चा सुरू आहे.
बीसीसीआय सरकारच्या मंजुरीची वाट पाहत आहे आणि जर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मालिका
आयोजित करता येत नसेल तर ती नंतर आयोजित करता येईल की नाही यावर चर्चा सुरू आहे.’’
भारत
आणि बांगलादेश यांच्यात शेवटचा सामना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झाला होता. त्यावेळी
टीम इंडियाने विजय मिळवला होता. भारताला पहिला एकदिवसीय सामना १७ ऑगस्ट रोजी
मीरपूर येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळायचा आहे. तिसरा आणि
शेवटचा एकदिवसीय सामना चितगाव येथे खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांच्या टी-२०
मालिकेतील पहिला सामना २६ ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टी-२०
सामना मीरपूर येथे खेळवला जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra