रत्नागिरी, 17 जानेवारी, (हिं. स.) : सरपंच आणि ग्रामसेवकांनी गावाचे कुटुंबप्रमुख जबाबदारी पार पाडताना स्वच्छ पाण्याबरोबरच पायाभूत सुविधांचा विकास करावा. आरोग्याची सुविधा, शौचालयांची स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था, पाण्याचे स्वच्छ स्रोत याबाबत ग्रामपंचायत आदर्श बनवावी, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या स्व. शामराव पेजे सांस्कृतिक भवनात रत्नागिरी पंचायत समिती पाणीटंचाई निवारण आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला प्रांताधिकारी जीवन देसाई, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव आदींसह सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
श्री. सामंत म्हणाले, सर्व ग्रामपंचायतींनी विशेषत: सरपंचांनी शौचालये अतिशय चांगल्या पद्धतीने आणि स्वच्छ राहतील याबाबत लक्ष द्यावे. पिण्याच्या पाण्यामध्ये सांडपाणी मिसळणार नाही, ते स्वच्छ असावे, ही सर्वांची जबाबदारी आहे. ग्रामसेवकांनी गावातील राजकारणापेक्षा विकासावर भर द्यावा. दिवंगत आर. आर. पाटील साहेबांनी तंटामुक्त गाव, हागंदारीमुक्त गाव योजनेच्या माध्यमातून गावागावात अभियान राबविले. त्यादृष्टीने सरपंच आणि ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतींवर अधिक भर द्यावा.मिळालेले पाणी ग्रामस्थांपर्यंत स्वच्छ स्वरूपात कसे पोहोचेल, याचे नियोजन सरपंचांनी करावे. त्याचबरोबर भविष्यातील पाण्याचे नियोजनही आतापासूनच करावे. शाळांच्या इमारतींसाठी ९० कोटी आणि ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ४५ कोटी तालुक्यासाठी मंजूर झाले आहेत. शहरातील दामले विद्यालयासाठी १५ कोटी मंजूर झाले असून येणाऱ्या पर्यावरण प्रकल्पांचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे. त्याचा निश्चितपणे पुढच्या पिढीसाठी फायदाच होणार आहे. प्रांताधिकारी श्री. देसाई आणि गटविकास अधिकारी श्री. जाधव यांनी ग्रामपंचायतींना पाणीटंचाईबाबत आढावा घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी