रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमेत ३४ क्षयरुग्ण
रत्नागिरी, 18 जानेवारी, (हिं. स.) : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जोखीमग्रस्त भागातील क्षयरोग निदानापासून वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांना गृहभेटीद्वारे राबविलेल्या शोध मोहिमेत जिल्ह्यात ३४ रुग्ण आढळले. क्षयरुग्ण शोधण्यासाठी आरोग्य विभागामा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमेत ३४ क्षयरुग्ण


रत्नागिरी, 18 जानेवारी, (हिं. स.) : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जोखीमग्रस्त भागातील क्षयरोग निदानापासून वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांना गृहभेटीद्वारे राबविलेल्या शोध मोहिमेत जिल्ह्यात ३४ रुग्ण आढळले.

क्षयरुग्ण शोधण्यासाठी आरोग्य विभागामार्फत २३ डिसेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ या कालावधीत सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जोखीमग्रस्त भागातील एकूण १ लाख ५९ हजार २९९ लोकसंख्येची तपासणी झाली. त्यापैकी ३ हजार ६५९ संशयित क्षयरुग्ण व्यक्ती आढळल्या. या संशयित क्षयरुग्णांपैकी अंतिम निदान झालेले ३४ क्षयरुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी दिली.

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग व मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा प्रभारी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली होती.

ही मोहीम जिल्ह्यातील चिरेखाणीतील कामगार, कारागृहातील कैदी, दिव्यांग शाळा व वसतिगृह, वृद्धाश्रम, बांधकाम स्थळाच्या ठिकाणी काम करणारे कामगार, आंब्याच्या बागांमधील राखणदार व मजूर, निर्वासितांची छावणी, औद्योगिक कामगार वसाहत, आदिवासी वाडी वस्ती, पोहोचण्यासाठी अवघड गावे आणि वस्त्या, ज्या गावात टीबी रुग्ण जास्त आहेत अशी गावे, आदिवासी शाळा व वसतिगृह, लोकसमुदायातील अतिकुपोषित भाग म्हणून ओळख असलेला आदिवासी भाग, एचआयव्ही अतिजोखीम गट, बेघर व रस्त्यावरची मुले, अनाथालय, मागील २ ते ३ वर्षांपासून टीबी रुग्णाच्या संपर्कात व सहवासात असलेली व्यक्ती, ६० वर्षांपेक्षा अधिक वयाची व्यक्ती, धूम्रपान करणारे, मधुमेही अशा शहरी, ग्रामीण, आदिवासी जोखीमग्रस्त भागाच्या ठिकाणी राबविण्यात आली.

दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, तसेच दोन आठवड्यांपेक्षा मुदतीचा ताप असणे, मागील तीन महिनन्यांमध्ये वजनात लक्षणीय घट होणे, मागील सहा महिन्यांच्या कालावधीत कधीही धुंकीवाटे रक्त पडणे, मागील एक महिन्यापासून छातीत दुखणे ही क्षयरोगाची लक्षणे असून, अशी लक्षणे आढळल्यास जवळच्या शासकीय दवाखान्यात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande