कुडाळ नायब तहसीलदारांच्या अंगावर वाळू डंपर घालण्याचा प्रयत्न
पिंगुळी गुढीपुर येथील घटना ; वाळू माफियांची मुजोरी वाढली डंपर चालकांविरोधात कुडाळ पोलिसात तक्रार महसूल कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण सिंधुदुर्ग, 18 जानेवारी (हिं.स.)। अवैध वाळू वाहतूक विरोधात कर्तव्यावर असणाऱ्या कुडाळचे नायब तहसीलदार प्रतीक आढाव आणि
कुडाळ तहसील कार्यालयाच्या आवारात उभे करून ठेवलेले कारवाई केलेले वाळू डंपर


पिंगुळी गुढीपुर येथील घटना ; वाळू माफियांची मुजोरी वाढली

डंपर चालकांविरोधात कुडाळ पोलिसात तक्रार

महसूल कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण

सिंधुदुर्ग, 18 जानेवारी (हिं.स.)। अवैध वाळू वाहतूक विरोधात कर्तव्यावर असणाऱ्या कुडाळचे नायब तहसीलदार प्रतीक आढाव आणि सोबतच्या कर्मचाऱ्यावर मुजोरपणा दाखवत डंपर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तशा आशयाची तक्रार श्री. आढाव यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली आहे. हि घटना आज पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमाराला पिंगुळी-गुढीपुर येथे घडली. दरम्यान कुडाळ महसूल विभागाच्या पथकाने अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या चार डंपर वर कारवाई केली पण यातील दोन डंपर चालक आपल्या ताब्यातील डंपर घेऊन पळून गेले तर दोन डंपर ताब्यात घेऊन ते तहसील कार्यालयाच्या आवारात उभे करण्यात आले आहेत. दरम्यान वाळू माफियांच्या मुजोरपणामुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहुतकीवर कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा महसूल विभागाने दिला आहे.

कुडाळ महसूल विभागाच्या पथकाने अवैधरित्या वाळूची वाहतुक करणारे चार डंपर पकडून कारवाईची प्रक्रिया सुरू असताना, त्यातील दोन डंपर चालकांनी कुडाळचे नायब तहसीलदार प्रतीक आढाव (वय ३०, सध्या रा.कुडाळ) व त्यांच्या समवेत असलेल्या कर्मचाऱ्यावर डंपर घालत दोघांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हि घटना शनिवारी पहाटे ४.१५ वाजताच्या सुमारास पिंगुळी गुढीपुर येथे घडली. या दोन्ही डंपर चालकांनी अंधाराचा फायदा घेत डंपरसह पलायन केले. शासकीय कामात अडथळा आणून, नायब तहसीलदार व सहकारी कर्मचारी यांच्या अंगावर डंपर घालुन त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोन्ही डंपर चालकाविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. तर उर्वरित दोन डंपर कारवाईसाठी महसूल पथकाने तहसीलदार कार्यालय आवारात आणून उभे केले आहेत. या घटनेने महसूल कर्मचाऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान यापूर्वीही अशा काही घटना घडल्या आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा ही घटना घडल्याने अवैधरित्या वाळू व्यावसाय करणाऱ्या वाळू माफियांची मुजोरी वाढल्याचे समोर आले आहे. तर अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहुतकीवर कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा महसूल विभागाने दिला आहे.

कुडाळचे तहसीलदार विरसिंग वसावे यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांच्या नेतृत्वाखाली अवैधरित्या वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले होते. यात श्री.आढाव यांच्यासह वालावल मंडळ अधिकारी धनंजय चंद्रकांत सिंगनाथ, चेंदवण ग्रा.म.अ. भरत नेरकर, तुळसुली तर्फ माणगावचे ग्रा.म.अ. ओंकार संजय केसरकर, घाटकरनगरचे ग्रा.म.अ. निलेश गौतम कांबळे, माणकादेवीचे ग्रा.म.अ. स्नेहल जयवंत सागरे, सोनवडे तर्फ कळसुलीचे ग्रा.म.अ शिवदास राठोड, पणदूर ग्रा.म.अ रणजित कदम, शिवापूरचे ग्रा.म.अ सुरज भांदिगरे या कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश होता. या पथकाकडून अवैधरित्या वाळू वाहतूक करणा-या डंपरवर कारवाईची प्रक्रिया सुरू असताना हि घटना घडली आहे.

श्री.आढाव यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तहसीलदारांच्या आदेशानुसार महसूलचे पथक ड्युटीवर नेमण्यात आले होते. महसुल विभागातर्फे नेहमीच अवैध वाळू उत्खनन व वाहुतकीवर विविध आदेशाने कारवाया होत असतात. यापुर्वी मी अशा प्रकारच्या आदेशान्वये अवैधरित्या बिगर परवाना वाळु वाहतुक करणाऱ्या डंपरवर कारवाया केलेल्या आहेत. याचा राग अशी वाहतुक करणाऱ्यांच्यामध्ये पुर्वी पासूनच माझ्या बद्दल आहे.

मी १७ जानेवारी २०२५ रोजी रात्री ११ वाजता तहसीलदारांच्या आदेशानुसार, पथकासह अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीची तपासणी व कारवाई करण्याकरीता जात असताना, आम्हाला गुढीपुर - पिंगुळी शिक्षक कॉलनी जवळ डंपर लागल्याचे आढळुन आले. तेव्हा आमच्या पथकाने त्या डंपरांची तपासणी केली असता त्यापैकी चार डंपर हे अनधिकृत अवैध वाळूने भरल्याचे आढळले. आम्ही बराचवेळ तेथे वाट पाहिली असता कोणीही इसम दिसून आले नाहीत. नंतर सुमारे 1 वाजता डंपर क्र. MH 07 X 0267 चा चालक तेथे उपस्थित झाला. त्यावेळी त्याला आमची ओळख करून देवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव मिलिंद नाईक (पुर्ण नाव माहित नाही) असे अर्धवट सांगितले. त्यानंतर नियमाप्रमाणे पंच यादी घालून सदर इसमासह डंपर तहसिलदार कार्यालय कुडाळ येथे घेवून जाण्यास सांगून त्याचे सोबत निलेश कांबळे यांना पाठवून सदर वाळुसह डंपर तहसील कार्यालय परिसरात लावण्यात आला.

. त्यानंतर उर्वरित तीन डंपरचे चालकांची वाट पाहत मी व ओंकार केसरकर, रणजित कदम, सुरज भांदिगरे असे गुढीपुर पिंगुळी शिक्षक कॉलनी येथे थांबलो. पथकांपैकी उर्वरित चार कर्मचारी गस्तीसाठी सोनवडे परिसरात गेले. दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ४.१२ वाजता आम्हाला डंपर सुरू झाल्याचा आवाज आल्याने मी माझ्या सोबतचे कर्मचारी ओंकार केसरकर, रणजित कदम, सुरज भांदिगरे यांना जागीच दुसऱ्या डंपर जवळ थांबवून, मी आवाज देत देत त्यादिशेने खात्री करण्याकरीता गेलो असता डंपर क्र. MH 06 AQ 7097 वरील चालकाला माझी ओळख सांगुन खाली उतरण्याचा इशारा केला असता तो डंपर मधुन खाली न उतरता, त्याने माझ्या अंगावर वेगात डंपर घालुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी वेगात बाजुला झालो, म्हणून प्राणानिशी वाचलो. तो डंपर तसाच वेगात पुढे निघून गेला, त्यावेळी थोडे अंतर मी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर मी डंपर थांबलेल्या मुळ जागी परत आलो असता, तेथे मला ओंकार केसरकर हा एकटाच थांबलेला व अत्यंत घाबरलेल्या स्थितीत दिसला.

तेव्हा मी त्याला व त्याच्या समवेत असलेल्या अन्य दोघांबद्दल विचारले असता त्याने सांगितले की, तुमच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न करणारा डंपर पकडण्यासाठी ते दुस-या दिशेने निघून गेले. व मी या ठिकाणी एकटाच उभा पाहून, येथील डंपर क्र. MH 07 C 6631 च्या चालकाने सदर डंपर चालु करून मी समोरून इशारा करून त्याला थांबवित असतानाही माझ्याही अंगावर घालून, मला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात मी बाजुला उडी घेवून जिव वाचविला. सदर डंपर वाळु सहित वेगाने मुंबई गोवा हायवेच्या दिशेने निघून गेला. स्वतःला वाचवताना दोन्ही हाताला दुखापत झालेली आहे, असे श्री.आढाव यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

त्यानुसार कुडाळ पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण करून, नायब तहसीलदार व सहकारी कर्मचारी या दोघांच्या अंगावर अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे डंपर घालून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोन्ही डंपर चालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहीती पोलीस ठाण्यातून देण्यात आली. याबाबतचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर करीत आहेत.

दरम्यान चार पैकी दोन डंपर चालकाने अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले. या डंपरचा महसूल पथकाने पाठलाग केला मात्र ते पसार झाले. उर्वरित दोन डंपर कारवाईसाठी तहसीलदार कार्यालय आवारात आणून उभे करण्यात आले आहेत. कारवाईवेळी नायब तहसीलदारांचा सहभाग असलेल्या महसूल पथकाच्या अंगावर अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकांनी डंपर घालण्याचा प्रयत्न केल्याने महसूल कर्मचाऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे वाळू माफियांकडून तहसीलदारांच्या अंगावर गाडी घालण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा ही घटना घडल्याने अवैधरित्या वाळू व्यावसाय करणाऱ्यांची दहशत वाढल्याचे समोर आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / निलेश जोशी


 rajesh pande