नाशिक, 18 जानेवारी (हिं.स.)।
विविध स्पर्धांमध्ये नेहमीच यश मिळविणाऱ्या मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे येथे आयोजित आंतरविद्यापीठ आविष्कार स्पर्धेतही गौरवपूर्ण यश संपादन करून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या स्पर्धेत केटीएचएम महाविद्यालयातील जुईली पंकज ढोकणे यांनी पीपीजी स्तरावरील शुद्ध विज्ञान विभागात (Pure Science Category) द्वितीय क्रमांक मिळवला. विद्यापीठातर्फे आयोजित सोहळ्यात त्यांना सन्मानित करण्यात आले. त्या सध्या मायक्रोबायोलॉजी विभागात डॉ. सुनीता पाटील आणि डॉ. सुचेता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करत आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनविषयक सर्जनशीलता, तांत्रिक कौशल्य, आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोन वाढवण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे अविष्कार स्पर्धा आयोजित केली जाते. ही स्पर्धा विद्यापीठस्तरावरून सुरू होऊन राज्यस्तरीय व आंतरविद्यापीठ पातळीपर्यंत पोहोचते, अशी माहिती आयोजकांनी दिली.
या यशाबद्दल बीआरसीचे डॉ. शरद काळे, सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, चिटणीस दिलीप दळवी, शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. नितीन जाधव, प्रा. डॉ. भास्कर ढोके, ‘केटीएचएम’चे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, ‘आयएमआरटी’चे प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी, उपप्राचार्य आणि मायक्रोबायोलॉजी विभाग तसेच सर्व कार्यकारिणी सदस्यांनी जुईली ढोकणे यांचा सत्कार व त्यांचे अभिनंदन केले.
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI