सोलापूर, 9 जानेवारी (हिं.स.)। राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोळीबार, हल्ले, कोयता गँगची दहशत, महिलांवरील अत्याचार अशा घटना समोर येत आहेत. अशातच मोहोळ तालुक्यात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मोहोळ तालुक्यात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी प्रशांत तुकाराम भोसले सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. या गोळीबारानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी संबधित व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.मोहोळ तालुक्यातील खानवी गावातील प्रशांत भोसले याच्या घराची झडती घेण्यात आली. झडतीमधे काळया रंगाची स्पेटीग रायफल, 4 जिवंत काडसुते, राउंड, एक बनावट पद्धतीची पिस्टल, मॅगझिनमध्ये सात जिवंत काडतुसे राऊंड आढळून आले. प्रशांत भोसले याची माहिती घेतली असता, सोलापूर जिल्ह्यासह मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. प्रशांत भोसले सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान पोलिस संबंधित प्रकरणाचा तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड