मेक्सिको सिटी , 15 ऑक्टोबर (हिं.स.)। मेक्सिकोमध्ये पूर आणि दरड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. पूरामुळे तब्बल ४०० लोकांचे एक संपूर्ण गाव नकाशावरून नाहीसे झाले आहे आणि अनेक भागांचा संपर्क तुटलेला आहे. अनेक लोक उंच भागांमध्ये अडकले असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. सेनेचे हजारो जवान आणि नागरिक स्वयंसेवक लोकांना वाचवण्यासाठी आणि रस्ते पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
मेक्सिको सरकारने पुष्टी केली आहे की पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ६४ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेकजण अद्याप बेपत्ता आहेत. अधिकार्यांनी इशारा दिला आहे की दूरच्या भागांमध्ये शेकडो ते हजारो लोक बेपत्ता असू शकतात आणि अधिक मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मेक्सिकोच्या पश्चिम किनारपट्टीवर दोन उष्णकटिबंधीय वादळे एकत्र आल्याने मुसळधार पावसाला सुरुवात झाली, ज्यामुळे नद्या भरून वाहू लागल्या आणि डोंगराळ भागांमध्ये दरडी कोसळू लागल्या. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शीनबाम यांनी सांगितले की, “सरकारची प्राथमिकता रस्ते पुन्हा उघडणे आणि हवाई पुलांना (एअर ब्रिज) सुरक्षित करणे आहे, जेणेकरून लोकांपर्यंत अन्नधान्य पोहचवता येईल आणि त्यांना वाचवता येईल.” सरकार आणि सैन्य लोकांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, पण अनेक स्थानिकांनी एकत्र येऊन स्वतःहून बचाव मोहिमा सुरू केल्या आहेत. काही लोकांनी अमेरिकेत राहणाऱ्या नातेवाइकांकडून मदत मागितली, ज्यांनी हेलिकॉप्टर भाड्याने घेऊन लोकांना सुरक्षित बाहेर काढले. खरं तर, खूप मोठ्या प्रमाणातील नुकसानीमुळे अनेक भाग पूर्णपणे संपर्कातून बाहेर गेले आहेत, आणि तिथे पोहोचण्यासाठी सेनेच्या जवानांना ६–७ तास पायी चालत जावं लागत आहे. मेक्सिकोमधील वेराक्रूज, हिडाल्गो आणि पुएब्ला या राज्यांमध्ये प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली आहे. हिडाल्गोमध्ये सुमारे १ लाख घरे नष्ट झाली आहेत.वेराक्रूजमध्ये २९ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 4 दिवसांत वेराक्रूजमध्ये २४ इंच पाऊस झाला आहे. वेराक्रूजचे राज्यपाल यांनी सांगितले की, राज्यात सुमारे ३ लाख लोक पूरामुळे प्रभावित झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode