वॉशिंग्टन , 15 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निकटवर्तीय सहकारी आणि उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते चार्ली किर्क यांना मरणोत्तर अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम प्रदान केला आहे. मंगळवारी, चार्ली किर्क यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आयोजित समारंभात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या समारंभात डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “आपण येथे एक निडर योद्धा, स्वातंत्र्यासाठी लढणारा, भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायक नेता, अपार श्रद्धा असलेला, अत्यंत गुणी आणि देशभक्त अमेरिकन नागरिक यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना आठवण्यासाठी एकत्र आलो आहोत.”
किर्क यांच्या हत्येबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, “सत्य बोलण्यासाठी, आपल्या श्रद्धांवर ठाम राहण्यासाठी आणि एक उत्तम व अधिक सक्षम अमेरिका घडवण्यासाठी त्यांनी सतत संघर्ष केला आणि त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांची हत्या करण्यात आली.” अमेरिकेच्या उटाह राज्यातील एका कॉलेजमध्ये १० सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमादरम्यान किर्क यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.
उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते चार्ली किर्क यांचे अमेरिकन प्रशासनाशी अतिशय घनिष्ठ संबंध होते. ट्रम्प यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत, ते दुसऱ्या कार्यकाळात प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम मिळवणारे पहिले व्यक्ती ठरले आहेत. सप्टेंबरमध्ये किर्क यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी ट्रम्प यांनी त्यांना “महान अमेरिकन नायक” आणि स्वातंत्र्यासाठी “शहीद” झालेला व्यक्ती असे संबोधले होते. किर्क हे डोनाल्ड ट्रम्प यांचे घनिष्ठ सहकारी होते आणि २०२४ मधील राष्ट्रपती निवडणुकीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी १९६३ साली ‘प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम’ या पुरस्काराची स्थापना केली होती, जो अमेरिका सुरक्षेसाठी किंवा राष्ट्रीय हितासाठी, जागतिक शांतता, सांस्कृतिक किंवा इतर महत्त्वपूर्ण सार्वजनिक किंवा खासगी प्रयत्नांमध्ये असामान्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode