इस्लामाबाद, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव आता उघड संघर्षात बदललेला आहे. बुधवारी (दि.१५) पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या स्पिन बोल्डक शहरात हवाई हल्ले केले. हे हल्ले चमन बॉर्डर क्रॉसिंगच्या जवळ करण्यात आले, जिथे अफगाण-तालिबानच्या तीन चौक्यांना लक्ष्य बनवण्यात आलं. स्थानिक सूत्रांनुसार, लोकांनी ड्रोन आणि लढाऊ विमानांद्वारे बॉम्ब टाकले जाताना पाहिलं. अफगाण सीमापोलिसांनी सांगितले की स्फोटांनंतर परिसरात काळा धूर पसरला आणि अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.
बुधवारी स्पिन बोल्डकमधील हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये परिसरातून उठणारा घनदाट धूर दिसून येतो. यामुळे दोन्ही देशांच्या सीमेवर संघर्ष अधिकच वाढला आहे. दोन्ही बाजूंच्या मिळून एकूण २१ जण मृत्युमुखी पडले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, सहा पाकिस्तानी पॅरामिलिटरी सैनिक मारले गेले, तर १५ अफगाण नागरिक मृत्युमुखी पडले असून डझनभर जखमी झाले आहेत.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा ताजा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा ११ ऑक्टोबरपासून दोन्ही देशांच्या सीमारेषेवर सातत्याने चकमकी घडत आहेत. या दिवशी अफगाण सुरक्षा दलांनी अनेक पाकिस्तानी पोस्ट्सवर हल्ला केला होता. वृत्तसंस्थेनुसार, अफगाण अधिकाऱ्यांचा दावा आहे की त्यांनी ५८ पाकिस्तानी सैनिकांना ठार केलं, तर पाकिस्तानने म्हटलं की त्यांनी २३ सैनिक गमावले आणि २०० हून अधिक ‘तालिबानी सैनिक आणि दहशतवादी’ मारले.
अफगाण-पाक संघर्षानंतर सीमांवर तणाव आहे. अफगाण पोलिस प्रवक्ते आबिदुल्लाह उकाब यांनी सांगितले की पाकिस्तानाशी लागून असलेल्या सर्व सीमा चौक्यांना बंद करण्यात आलं आहे. सोमवारी चमन बॉर्डर ओलांडणाऱ्या सुमारे १,५०० अफगाण नागरिकांना पायदळ परत जाण्याची परवानगी देण्यात आली, मात्र व्यापार आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दोन्ही देशांमधील शेकडो ट्रक आणि प्रवासी अडकलेले आहेत.
पाकिस्तानच्या सरकारी माध्यमांनुसार, अफगाणिस्तानच्या सैन्याने आणि पाकिस्तानी तालिबानने मिळून विनाकारण एका पाकिस्तानी चौकीवर गोळीबार केला. त्यानंतर खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कुर्रम जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की पाकिस्तानी सैन्याने तालिबानचा एक मोठा प्रशिक्षण केंद्रही उद्ध्वस्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode