इस्लामाबाद, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। पाकिस्तानी सुरक्षा दल आणि अफगाण तालिबानमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली. खैबर पख्तूनख्वामधील कुर्रम जिल्ह्यात, दोन्ही देशांच्या सीमेवर मंगळवार रात्री पाकिस्तानी सुरक्षा दल आणि अफगाण तालिबान यांच्यात भीषण चकमक झाली.
पाकिस्तानच्या मीडिया रिपोर्टनुसार, “अफगाण तालिबान आणि फितना अल-खवारिज यांनी कुर्रममध्ये विनाकारण गोळीबार केला. त्याला पाकिस्तानी सैन्याने पूर्ण ताकद आणि तीव्रतेने प्रत्युत्तर दिले.” “फितना अल-खवारिज” हा शब्द पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून प्रतिबंधित तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेच्या लढवय्यांसाठी वापरला जातो.
पाकिस्तानने असा दावा केला आहे की, या संघर्षात अफगाण तालिबानच्या चौक्यांचे मोठे नुकसान झाले असून कमीत कमी एक रणगाडा (टँक) नष्ट करण्यात आला आहे. गोळीबारानंतर तालिबान लढवय्ये आपले तळ सोडून पळून गेले, असा दावाही पाकिस्तानने केला आहे.
अहवालानुसार, कुर्रम सेक्टरमध्ये अफगाण तालिबानची आणखी एक पोस्ट आणि टँक पोजिशन नष्ट करण्यात आली. त्यानंतर शमसादर पोस्टवरील चौथ्या टँक स्थितीलाही नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऑपरेशनमध्ये फितना अल-खवारिजचा एक प्रमुख कमांडर ठार झाला आहे.
यापूर्वी दिवसभरात, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, परराष्ट्र सचिव आमना बलूच यांनी पाक-अफगाण सीमा भागातील अलीकडील घडामोडींबाबत इस्लामाबादमधील परदेशी राजदूतांना सविस्तर माहिती दिली. निवेदनात सांगितले, “त्यांनी पाकिस्तानच्या वैध सुरक्षाविषयक चिंता आणि त्याच्या प्रादेशिक अखंडतेसह राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी असलेल्या दृढ संकल्पावर भर दिला.”
पाकिस्तानी लष्कराच्या मते, गेल्या वीकेंडमध्ये अफगाण तालिबानच्या सैन्याने कोणत्याही कारणांशिवाय पाकिस्तानी सीमा चौक्यांवर हल्ला केला होता, ज्यामध्ये २३ पाकिस्तानी सैनिक ठार झाले. पाकिस्तानचा दावा आहे की त्यांनी या हल्ल्याला उत्तर दिले आणि २०० हून अधिक तालिबान व संबंधित दहशतवाद्यांचा खात्मा केला.
दुसरीकडे, काबुल प्रशासनाचा दावा आहे की त्यांनी हा हल्ला बदला घेण्यासाठी केला होता. त्यांनी आरोप केला की इस्लामाबादने मागील आठवड्यात अफगाण सीमाभागात हवाई हल्ले केले होते. पाकिस्तानने या हवाई हल्ल्यांची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही, मात्र त्यांनी पुन्हा एकदा काबुलला “आपल्या भूमीवर तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानला आसरा देणे थांबवा” असे ठणकावले आहे.
इस्लामाबादने तालिबान सरकारला वारंवार सांगितले आहे की, सीमापार हल्ल्यांसाठी अफगाण भूमीचा वापर होऊ देऊ नका. मात्र काबुलने हे आरोप फेटाळले असून ठामपणे सांगितले आहे की, अफगाण भूमीचा उपयोग कोणत्याही शेजारी देशाविरोधात केला जात नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode