काठमांडू , 16 ऑक्टोबर (हिं.स.)। पश्चिम नेपाळच्या सुदूरपश्चिम प्रांतात गुरुवारी (दि.१६)भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 4.9 रिश्टर स्केलवर नोंद करण्यात आली आहे. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची तत्काळ कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.मात्र, धक्के जाणवल्यामुळे नागरिक घाबरून घराबाहेर पडले. गेल्या महिन्यातही नेपाळमध्ये अनेक वेळा भूकंपाचे झटके जाणवले होते.
राष्ट्रीय भूकंप निरीक्षण केंद्राच्या माहितीनुसार, भूकंप गुरुवारी पहाटे 1:08 वाजता झाला. याचे केंद्र बझांग जिल्ह्यातील दंतोला भागात होते. बझांग जिल्हा काठमांडूपासून सुमारे 475 किलोमीटर पश्चिमेकडे आहे. शेजारील बाजुरा, बैतडी आणि दारचुला जिल्ह्यांमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याची माहिती अद्याप तत्काळ मिळालेली नाही.
नेपाळ हा अत्यंत सक्रिय टेक्टॉनिक क्षेत्रांपैकी एक आहे. भूकंपीय झोन IV आणि V मध्ये मोडणारा हा प्रदेश फारच संवेदनशील मानला जातो. याठिकाणी दरवर्षी अनेक लहान-मोठे भूकंप होतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode