मॉस्को, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी दावा केला की, भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. या प्रकरणावर आता मॉस्कोची प्रतिक्रिया आली आहे.भारतामध्ये रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी रशियन तेल आवश्यक आहे आणि भारत हा रशियाचा विश्वासू भागीदार आहे.
राजदूत डेनिस अलीपोव म्हणाले, “भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी एक-तृतीयांश रशियाकडून येतो.आम्ही भारतासाठी स्वस्त आणि विश्वासार्ह पर्याय ठरलो आहोत. रशिया आणि भारत यांच्यातील रणनीतिक भागीदारी ही जागतिक स्थैर्य आणणारी एक मोठी शक्ती आहे. हे नाते विश्वासावर आधारित आहे, आणि ऊर्जा क्षेत्रात आम्ही भारताचे सर्वात विश्वासू भागीदार आहोत.”
रशियाने डोनाल्ड ट्रम्प यांना कठोर संदेश देत राजदूत म्हणाले, “ग्लोबल नॉर्थ (अमेरिका व युरोपियन देश) अजूनही टॅरिफ आणि विविध प्रकारचे निर्बंध लावत आहेत, हे दाखवते की ते बहु-ध्रुवीय जग मान्य करायला तयार नाहीत.त्यामुळे जागतिक शासनव्यवस्थेतील सुधारणा लांबतील, पण त्या सुधारणा आता अत्यंत आवश्यक आहेत.”
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले, “भारत हा तेल आणि गॅसचा एक महत्त्वाचा आयातदार आहे.अस्थिर ऊर्जा परिस्थितीत भारतीय ग्राहकांचे हित जपणे हे आमचे प्राधान्य राहिले आहे. भारत नेहमीच आपल्या जनतेच्या फायद्याचा विचार करूनच निर्णय घेतो.”
डोनाल्ड ट्रम्प सध्या भारत आणि चीन दोघांवर नाराज आहेत. चीन-अमेरिका दरम्यान टॅरिफ युद्ध सुरू झाले आहे,ज्यामध्ये ट्रम्प यांनी चीनवर टॅरिफ लावले, आणि चीननेही प्रत्युत्तर दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode