इस्लामाबाद, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात गुरुवारी(दि.१६) एका बोगद्याजवळ ट्रक उलटल्यानं मोठा अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील किमान १५ जणांचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले आहेत. ही माहिती बचाव अधिकाऱ्यांनी दिली आहे.
रेस्क्यू आपत्कालीन सेवांमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा अपघात मलकंद जिल्ह्यातील स्वात मोटरवेवर घडला.सर्व पीडित स्वातच्या बहरीन तहसीलमधील जिब्राल भागातील एक खानाबदोश (भटकंती करणाऱ्या) कुटुंबातील होते, जे हंगामी स्वरूपात वेगवेगळ्या भागांमध्ये स्थलांतर करत असतात.अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले.जखमी आणि मृतांच्या शवांना जिल्हा मुख्यालय रुग्णालय, बटखेला येथे हलवण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी १५ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली, तर आठ जखमींवर उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींपैकी चार जणांना पुढील विशेष उपचारासाठी स्वातमध्ये रेफर करण्यात आले आहे. बचाव सूत्रांच्या माहितीनुसार, मृत आणि जखमींमध्ये पुरुष, महिला आणि लहान मुले यांचा समावेश आहे.खैबर पख्तूनख्वाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मुहम्मद सोहेल अफरीदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.त्यांनी मृतांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना केली, तसेच त्यांच्या कुटुंबियांना हा दु:खद प्रसंग सहन करण्याची शक्ती आणि धैर्य मिळो, अशी प्रार्थनाही केली.याचसोबत संबंधित अधिकाऱ्यांना जखमींना तातडीने आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode