जळगाव, 18 ऑक्टोबर, (हिं.स.) सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे लाखो शेतकऱ्यांच्या खरीप शेतपिकांचे नुकसान झाले आहे. यातून सावरण्यासाठी राज्य शासनाकडे जळगाव जिल्हा प्रशासनाने ३१४ कोटीहून अधिक अनुदानाची मागणी केली आहे. ही अनुदान मदत दिवाळीदरम्यान मिळणार असून, यासोबतच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या २१ व्या हप्त्याचा लाभही मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
केंद्र शासनाकडून दरवर्षी सहा हजार रुपये याप्रमाणे अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी दिला जातो. आतापर्यंत शेतकऱ्यांना २० वा हप्त्याचा लाभदेण्यात आला असून शेतकरी २१ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा हप्ता दिवाळीपूर्वी, ऑक्टोबरअखेर शेतकऱ्यांच्या खात्यात होण्याची डीबीटी अंतर्गत जमा शक्यता आहे.केंद्र स्तरावरून २० वा हप्ता गेल्या दोन महिन्यापूर्वी २ ऑगस्ट रोजी वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता. त्यानुसार अतिवृष्टी आणि ओला दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, २१ वा हप्ता दिवाळीपूर्वी ऑक्टोबरअखेर शेतकऱ्यांच्या संबंधीत बँक खात्यावर जमा होईल, अशी शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान योजनेच्या २१ व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यांना लाभमिळू शकेल. मात्र, केंद्र सरकारच्या सूचनानुसार जिल्ह्यातील अजूनही ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्यांना २१ वा हप्ता थांबवण्यात येईल किंवा अडचणी येतील. त्यामुळे या शेतकऱ्यांनी तातडीने आपले सरकार वा संबंधित केंद्रावर किंवा मोबाइलवर ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर