रायगड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात वाढलेल्या वाहतूक कोंडी आणि गर्दीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी केली आहे.
प्रितम म्हात्रे यांनी यासंदर्भात पनवेल शहर वाहतूक शाखा तसेच महापालिका आयुक्त यांना स्वतंत्र पत्र पाठवून काही ठोस सूचना दिल्या आहेत. त्यांनी म्हटले की, दिवाळीच्या कालावधीत सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सर्व प्रमुख चौकांवर महापालिकेचे सुरक्षा रक्षक तैनात करावेत, तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी पुरेशा संख्येने नियुक्त करून नागरिकांना योग्य मार्गदर्शन करावे. गर्दीच्या ठिकाणी वाहनांसाठी शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था निर्माण करण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.
पनवेल शहरात दिवाळीपूर्व खरेदीसाठी ग्रामीण भाग व रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात नागरिक येत असल्याने प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अपघात आणि अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वाढली असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
“नागरिकांची दिवाळी शांततेत, सुरक्षिततेत आणि उत्साहात साजरी व्हावी, हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे तातडीने कार्यवाही करून वाहतूक नियंत्रण व गर्दी व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करावी,” अशी मागणी प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी केली आहे. या मागणीमुळे प्रशासनावर तातडीने कृती करण्याचा दबाव वाढला असून, नागरिकांमध्ये वाहतूक व्यवस्थापनाबाबत सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके