चंद्रपूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।
चंद्रपूर येथील बालगृहामध्ये शुक्रवारी दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस.भिष्म यांनी बालगृहातील मुलींसोबत दिवाळी साजरी करून त्यांचा आनंद द्विगुणित केला.
बालगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसोबत कुटुंबाप्रमाणे सण साजरा करताना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मुलींना जीवनात सकारात्मकता राखून यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांनी बालकांना बाहेरील जगाचा अनुभव घेऊन आयुष्य योग्य मार्गावर जगण्याचा सल्ला देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश भिष्म यांनी बालगृहातील वास्तव्याकडे एक संधी म्हणून पाहण्याचा संदेश देत त्या संधीचे सोनं करण्यासाठी प्रेरित केले. तसेच मुलींच्या शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी आवश्यक मदत करण्याची ग्वाही दिली. या प्रसंगी बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष सीमा लाडसे यांनी मुलींना आकाशात गरुड होऊन झेप घेण्यासाठी प्रयत्न करा, 'स्काय इज द लिमिट' मानून अभ्यास करा, असा संदेश दिला. बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. क्षमा बासरकर यांनी शिक्षणासोबतच कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून देत आत्मविश्वास वाढविण्याचा सल्ला दिला.
बालगृहातील मुलींनी स्वतः तयार केलेले दिवे, आकाशकंदील, ग्रीटिंग कार्ड इत्यादी हस्तकला वस्तूंच्या प्रदर्शनीस मान्यवरांनी भेट देऊन मुलींचे कौतुक केले. या साहित्याची खरेदी करून त्यांनी बालिकांचा उत्साह अधिक वाढविला. त्यानंतर सर्व मान्यवरांनी बालकांसोबत दिवाळी फराळाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाला बाल न्याय मंडळाच्या सदस्या डॉ. जोत्स्ना मोहितकर, वनिता घुमे, भावना देशमुख, ॲड. मनिषा नखाते, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर अधिक्षक, समुपदेशक आणि कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी केले. शेवटी समुपदेशक यशवंत बावणकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव