रायगड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। हिंदू संस्कृतीत गायीला गोमाता मानले जाते. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गायीच्या पूजनाने केली जाते. त्याच परंपरेत म्हसळा शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने वसुबारस सण भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी गोमातेचे पूजन करून गोडधोड भोजनाचा प्रसाद अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमास म्हसळा शहराचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप कहाळे, माजी हिंदू समाज अध्यक्ष महादेव पाटील, बजरंग दलाचे प्रखंड मंत्री प्रसन्न निजामपुरकर, विनोद सुतार, बाबु बनकर, युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे, शिवसेना तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले, भाजप शहर अध्यक्ष शरद चव्हाण, नगरसेविका सरोज म्हशिलकर, पर्यटन सभापती राखी करंबे, तसेच पत्रकार बाबु शिर्के, महेश पवार आणि बजरंग दलाचे अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, “गायीचे पूजन हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. गोसेवा ही केवळ परंपरा नसून ती आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे. समाजातील शांती आणि सुव्यवस्था राखून गोरक्षणाची भावना जोपासली पाहिजे.”
माजी अध्यक्ष महादेव पाटील यांनी आपल्या भाषणात संत तुकाराम महाराज यांची ओवी उद्धृत करत सांगितले की, “ज्याच्या घरी गाय, तिथे विठ्ठलाचे पाय.” त्यांनी गायीच्या उपयुक्ततेबद्दल सांगताना शेण, मूत्र, दूध, तूप, दही आदींचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी गोरक्षणाची शपथ घेतली. शेवटी प्रसन्न निजामपुरकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून गोमातेच्या पूजनातून समाजात सेवा, श्रद्धा आणि संस्कार जोपासण्याचे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके