लोकसभा मतमोजणीतील पत्रकार हल्ला प्रकरणी जयंत पाटील दोषी
रायगड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। २०१९ च्या लोकसभा मतमोजणी दरम्यान लोकसत्ता दैनिकाचे पत्रकार हर्षद कशाळकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस व माजी आमदार जयंत पाटील यांना अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सहा
जयंत पाटील


रायगड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।

२०१९ च्या लोकसभा मतमोजणी दरम्यान लोकसत्ता दैनिकाचे पत्रकार हर्षद कशाळकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस व माजी आमदार जयंत पाटील यांना अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सहा वर्षांपासून सुरू असलेल्या सुनावणीचा निकाल शुक्रवारी लागला. न्यायालयाने पाटील यांना भारतीय दंड विधान कलम ३२३ अंतर्गत दोषी ठरवत एक वर्ष चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र देण्याचा आणि पत्रकारास पाच हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

२४ मे २०१९ रोजी लोकसभा मतमोजणी दरम्यान अलिबागच्या मतमोजणी केंद्रात ही घटना घडली होती. पत्रकार हर्षद कशाळकर यांच्याशी “तुम्ही पत्रकार काही बातम्या छापता” असे म्हणत जयंत पाटील यांनी थेट हल्ला केल्याचा आरोप होता. या घटनेनंतर अलिबाग पोलीस ठाण्यात पाटील, पंडीत उर्फ सुभाष पाटील आणि अभिजित कडवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी चौकशी पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी एम. बी. अत्तार यांच्या न्यायालयात झाली. फिर्यादी, पंच आणि तपास अधिकारी यांच्यासह १३ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. सर्व साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने जयंत पाटील यांना दोषी ठरवले.

सरकारी पक्षात प्रसाद पाटील, कविता परिट आणि नईमा घट्टे यांनी या खटल्यात महत्त्वाची भूमिका निभावली. सहा वर्षांच्या दीर्घ न्यायप्रक्रियेनंतर अखेर पत्रकारावर झालेल्या हल्ल्याला न्यायालयाने ‘हल्ला नव्हे, अपराध’ असा ठपका ठेवत दोषी ठरवले. न्यायालयाचा हा निर्णय पत्रकार सुरक्षेसाठी मार्गदर्शक आणि समाजात जागरूकतेचा संदेश देणारा ठरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande