नंदुरबार,, 18 ऑक्टोबर (हिं.स.) महाराष्ट्र शासनाने सप्टेंबर 2025 महिन्यात राज्यातील विविध भागांमध्ये अवर्षण आणि पूरामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना मदतीचा मोठा दिलासा दिला आहे. महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून एकूण रुपये 3 हजार 258 कोटी 56 लाख 47 हजार रुपये इतका निधी वितरित करण्यात येणार आहे. यात नंदुरबार जिल्ह्यासाठी रुपये 53 लाख 99 हजारांचा निधी मंजूर केला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे यांनी कळविले आहे.
नंदुरबार जिल्ह्याला मिळणार रुपये 53 लाख 99 हजारांची मदत नाशिक विभागाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि पूरामुळे 931 शेतकरी बाधित झाले असून त्यांच्या 445 हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाल्याची नोंद आहे. यासाठी शासनाने रुपये 53 लाख 99 हजारांचा निधी मंजूर केला आहे. या अनुदानामुळे जिल्ह्यातील शेती पुनरुज्जीवनाला मोठा आधार मिळणार असून पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे. डीबीटी द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम मदत वितरण प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल केली असून, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदानाची रक्कम DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. जिल्हानिहाय लाभार्थ्यांची यादी तयार करून संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर ती प्रसिद्ध करण्यात येईल.
पारदर्शकतेवर भर महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, एका हंगामात एका शेती हानीसाठीच मदत दिली जाईल. कोणत्याही लाभार्थ्याला दुहेरी मदत होऊ नये यासाठी काटेकोर तपासणी करण्यात येईल. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत या प्रक्रियेची थेट अंमलबजावणीची केली जाईल. शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण नंदुरबार जिल्ह्यासारख्या आदिवासी बहुल आणि शेतीप्रधान भागात या निधीमुळे शेतकऱ्यांना नवजीवन मिळणार आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत भात, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन तसेच फळपिके यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाच्या या निर्णयामुळे या पिकांच्या पुनर्लावणी व पुढील हंगामातील उत्पादनक्षमतेस चालना मिळेल. महसूल व पुनर्वसन विभागाचा हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीसह जारी केला असून, तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) सुद्धा उपलब्ध आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर