रत्नागिरी, 20 ऑक्टोबर, (हिं. स.) : दीपावलीच्या पूर्वरात्रीला रत्नागिरीतील झा़डगाव येथील आली लहर केला कहर ग्रुपतर्फे 18 फुटी अतिभव्य नरकासुराचे दहन करण्यात आले.
दिवाळीचा पहिला दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरी करण्याची पद्धत आहे, समाजातील वाईट प्रवृत्तीचा नाश करून क्रूरता आणि राक्षसी वृत्तीचा सर्वनाश करण्याच्या हेतूने आणि अधर्मावर मात करून धर्माच्या उद्धारासाठी पौराणिक कथेमध्ये नरकासुर नावाच्या राक्षसाचे दहन करण्यात आले होते, त्याच पार्श्वभूमीवर सामाजिक जाण ठेवून आली लहर केला कहर या ग्रुपने लाइट/डीजे साऊंड आणि ढोल ताशांच्या गजरात राक्षसरूपी नरकासुराचे दहन करून समाजात सामाजिक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
अठरा फूट उंचीची नरकासुराची प्रतिकृती साकार करण्यासाठी सुमारे २० दिवस लागले. ग्रुपचे सर्व सदस्य विशेष करून सुयोग मोरे, बाबू जांभळे, बाळा बसणकर, सिद्धेश देसाई, निखिल घाग, सागर नांदगावकर, भैय्या गोवेकर आणि इतरही मुलांनी मेहनत घेतली. त्यामध्ये झाडगाव येथील सर्व थोरामोठ्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. परिसरातील नागरिकांनी नरकासुर दहनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी