जालना, 20 ऑक्टोबर (हिं.स.) शिवसेनेच्या वतीने दिवाळीच्या पवित्र मुहूर्तावर पूरग्रस्त कुटुंबांना संसार उपयोगी वस्तूंचं वितरण करण्यात आलं. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे जालना शहरातील अनेक भागांमध्ये घरात पाणी शिरून मोठं नुकसान झालं होतं. या पार्श्वभूमीवर मानवी संवेदनांना उजाळा देत शिवसेनेच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला.
जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसर, अण्णाभाऊ साठे नगर, रहिम नगर, लक्कडकोट, बसस्टँड परिसरातील पूरग्रस्त कुटुंबांना संसार उपयोगी वस्तूंचं वाटप आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आलं.
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, संतोष चौधरी, पांडूशेठ खैरे, सर्जेराव वाघमारे, किरण कांबळे, रितेश चौधरी नवमहालकर तसेच इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
पूरग्रस्त कुटुंबांना आवश्यक वस्तूंचं वितरण करून त्यांच्या दिवाळीत आनंदाचा प्रकाश पसरवण्याचा उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं.
या प्रसंगी आमदार अर्जुनराव खोतकर म्हणाले,
“शिवसेना नेहमीच गरीब आणि दिनदुबळ्या लोकांसोबत उभी राहिली आहे. पूरग्रस्तांना मदत करून त्यांच्या आयुष्यात थोडा आनंद आणणं हे आमचं कर्तव्य आहे. ही संसारकिट दिवाळीला सुख-समृद्धी आणणारी ठरेल.”
शिवसेनेच्या या सामाजिक उपक्रमामुळे जालना शहरात सकारात्मक वातावरण निर्माण झालं असून दिवाळीचा आनंद दुप्पट झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis