बेलग्रेड, 22 ऑक्टोबर (हिं.स.)।सर्बियाच्या संसद भवनाबाहेर बुधवारी (२२ ऑक्टोबर) गोळीबाराची एक गंभीर घटना घडली असून, यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला आहे. गोळीबार होताच परिसरात खळबळ उडाली आणि राष्ट्रपती अलेक्झांडर वुसिक यांचे समर्थकांचं तंबू शिबिर पेटले.राष्ट्रपती वुसिक, जे सध्या सरकारविरोधी निदर्शनांचा सामना करत आहेत, या गोळीबाराला ‘दहशतवादी हल्ला’ असल्याचे म्हटले आहे. स्थानिक मीडिया अहवालानुसार, सशस्त्र सुरक्षा अधिकाऱ्यांनी संसद भवनाबाहेर एका मोठ्या तंबूजवळ धाव घेतली. काही क्षणात गोळ्या झाडल्या गेल्या आणि नंतर तंबूला आग लागली. सूत्रांच्या माहितीनुसार, एका ७० वर्षीय व्यक्तीने तंबू शिबिरात असलेल्या ५७ वर्षीय व्यक्तीच्या पायावर गोळी झाडली, आणि त्यानंतर एका गॅस सिलिंडरवर गोळी झाडली, ज्यामुळे तंबू पेटला. अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणली. या घटनेतील एका व्यक्तीस अटक करण्यात आली असून, जखमीला तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आरोग्यमंत्री झ्लाटिबोर लोनकर यांनी सांगितले की, जखमी व्यक्तीची स्थिती गंभीर आहे आणि त्याचे तात्काळ शस्त्रक्रियेसाठी नियोजन करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी अद्याप या प्रकरणावर कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही, आणि घटनेबाबत अधिक माहितीही उघड केलेली नाही.मात्र सोशल मीडियावर गोळीबाराच्या क्षणाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये सशस्त्र सुरक्षारक्षक तंबूकडे धावताना दिसत आहेत. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये, एक व्यक्ती जमिनीवर पडलेला दिसतो, त्याचे हात पाठिमागे बांधलेले आहेत आणि त्याला पोलिसांनी घेरले आहे. ही घटना बेलग्रेडमध्ये सुरू असलेल्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर घडली आहे, जिथे सरकारसमर्थक आणि विरोधकांमध्ये वारंवार आंदोलनं आणि संघर्ष घडत असतात. या हल्ल्यानंतर संसद भवनाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे, आणि संपूर्ण परिसर हाय अलर्टवर ठेवण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode