वॉशिंग्टन, 22 ऑक्टोबर (हिं.स.)।रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात होणारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची बैठक स्थगित करण्यात आली आहे. ही माहिती स्वतः अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही बैठक बुडापेस्टमध्ये होणार होती. मात्र, सध्या ही बैठक का स्थगित करण्यात आली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुतिन आणि ट्रम्प यांच्यातील या बैठकीची घोषणा गेल्या आठवड्यातच करण्यात आली होती, तरीसुद्धा बैठकीची ठोस तारीख निश्चित झालेली नव्हती. ही बैठक अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ठरवण्यात आली होती. दरम्यान, मॉस्कोने युक्रेनमध्ये युद्धविरामाच्या मागणीला स्पष्ट नकार दिला आहे. तसेच युक्रेनविषयी होणारी पुतिन-ट्रम्प बैठकही आता स्थगित झाल्याने, युद्ध थांबवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न सध्या थंडावल्याचे दिसत आहे. पुतिन आणि ट्रम्प यांच्यात यापूर्वी ऑगस्ट महिन्यात अलास्कामध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर असे वाटत होते की हे दोघे नेते युक्रेन-रशिया युद्धासंदर्भात काहीतरी सामंजस्य करार होतील आणि शांतता प्रस्थापित करण्याचा मार्ग निघेल. मात्र, या वेळची बैठक रद्द झाल्याने, हा मुद्दा आता आणखी लांबू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, ट्रम्प आणि पुतिन यांच्यात सध्या भविष्यात कोणतीही बैठक होण्याची योजना नाही. याआधी दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ आणि सर्गेई लावरोव यांच्यात फोनवर चर्चा झाली होती. रशियाने युक्रेनमध्ये कायमस्वरूपी शांततेसाठी अट घातली आहे की युक्रेनला गैर-परमाणु देश ठेवण्यात यावे आणि अमेरिका नेतृत्वाखालील नाटो सैनिकी आघाडीत त्याचा समावेश केला जाऊ नये. रशिया आणि युक्रेन यांच्यात 2022 पासून युद्ध सुरू आहे. पुतिन यांनी पहिल्यांदा फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनवर हल्ल्याचा आदेश दिला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरूच आहे. पुतिन यांनी अनेकदा सांगितले आहे की ते शांतता चर्चेसाठी तयार आहेत, पण दोन्ही देशांमध्ये असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमत होत नाही, म्हणूनच कोणतीही ठोस प्रगती होऊ शकलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode