
नागपूर, 24 ऑक्टोबर, (हिं.स.) : भाजपा बूथप्रमुखांचे एक लाख व्हाट्सअप ग्रुप पार्टीच्या वॉररुमसोबत जोडलेले आहेत. याबाबत ते सर्वजण अवगत आहेत. यामाध्यमातून सरकारच्या कल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोचवत असतो. पक्षामध्ये कार्यकर्त्यांसोबतचा संवाद याच व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून होतो, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
ते म्हणाले, ग्रूपवर त्यावर आलेल्या कमेंट्स वाचून भूमिका ठरविली जाते. नकारात्मक भावना नष्ट करून सकारात्मकता निर्माण केली जाते. यातून कार्यकर्ते व पार्टी यांच्यातील संवाद अधिक चांगला होतो. त्यामुळे, आमच्या पक्षात आम्ही काय करावे हे ठरविणारे संजय राऊत कोण आहेत? असा प्रश्नही त्यांनी केला.
भंडारामध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या दिवाळी मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानावरून राऊत यांनी टीका केली. त्यावर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले.
त्यांनी नागपूर येथे माध्यमाला सांगितले की, निवडणुकीदरम्यान अनेक निगेटिव्ह - पॉझिटिव्ह बातम्या येत असतात. आमच्या कार्यकर्त्यांच्या कमेंट तपासण्याचे काम आमची यंत्रणा करत असते. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे एक लाख ग्रुप पार्टीने तयार केले आहेत व ते सर्व वॉर रूमसोबत जोडलेले आहेत. ही माहिती सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आहेच. ते संपूर्ण चेक करतो. व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षांवर काय काम केले पाहिजे, काय अडचणी आहेत ते सोडवण्याचे काम करतो. यावरून संजय राऊत यांना मिरच्या का झोंबल्या? असा प्रश्नही त्यांनी केला.
* भाजपाचा पहिला जोर महायुतीवरच !
जिथे महायुती होत असेल, त्याठिकाणी केली पाहिजे. आमचा पहिला जोर महायुतीवर आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तीन नेत्यांची समिती बनवलेली आहे. ज्या ठिकाणी दोन कार्यकर्ते तुल्यबळ आहेत; तिथे आपसात लढतील. मात्र, मनभेदाने मतभेद होणार नाही याची काळजी घेऊ.
* विधानसभेपेक्षा अधिक मते घेऊ
महाविकास आघाडीत कितीही जुळले तरी महायुती 51 टक्के मतदान संपूर्ण जिल्हा परिषदा मनपा जिंकेल. विधानसभेत जेवढे मत मिळाले त्यापेक्षाही अधिक मते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपा महायुतीला मिळतील. एकही जिल्हा परिषद नगरपालिका महाविकास आघाडीला जिंकता येणार नाही.
* भाजपात प्रवेशाची काँग्रेसनेत्यांची इच्छा
काँग्रेसचे अनेक नेते, कार्यकर्ते भाजपमध्ये येण्याची इच्छा नेहमी व्यक्त करतात. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. काँग्रेसमध्ये कोणी विचारत नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करत नाही. कोण कुठे आहे याची माहिती काँग्रेसला नाही. चांगले पदाधिकारी हे बाजूला पडलेले आहेत.पक्षातील आणि नेत्यातील संवाद यात फार मोठी विसंगती निर्माण झाली आहे. भाजपचा कार्यकर्ता कोणत्याही वरिष्ठ नेत्यांना भेटू शकतो, मात्र काँग्रेसमध्ये राज्यातील नेत्यांना भेटण्याची कुठेही शक्यता नाही. विसंवाद असल्याने कार्यकर्ते तुटलेले आहेत.
* राजकारण जिवंत ठेवण्याचा उद्योग
पुण्यातील धंगेकर- मोहोळ विषयावर बोलताना बावनकुळे म्हणाले, मोहोळ यांचा बिल्डरशी कुठूनही संबंध राहिला नाही. त्यामुळे महायुतीतील कार्यकर्त्यांनी हा विषय संपविला पाहिजे.धंगेकर हे स्थानिक राजकारणात मुरलीधर मोहोळ यांना आपला विरोधक समजतात कारण त्यांचा निवडणुकीत प्रचंड मतांनी पराभव झाला. मोहोळ यांनी यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. पण पिसाळलेल्या लोकांना स्थानिक राजकारण करायचे आहे.मोहोळ यांच्यावर बोलल्याशिवाय त्यांना आपलं राजकारण जिवंत ठेवता येत नाही.आम्ही धंगेकरवर कुठलीही कारवाई करण्याची मागणी केली नाही.
* नेत्यांनी आचारसंहिता पाळावी !
महायुतीच्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सूचना दिल्या आहेत की, महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होऊ नयेत,अशी भूमिका असावी. पण एखाद्याला वारंवारच सवय पडली, आपली व्यक्तिगत दुश्मनी काढायची आहे, मतदारसंघात स्वतःचा व्यक्तीगत वाद,अस्तिव टिकवण्यासाठी काही लोक महायुतीच्या लोकांनाच विरोधक समजत आहेत. आपला विरोधक कोण आहे हे महायुतीच्या कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे. आपण सरकारमध्ये काम करतोय, आमच्याकडे असेल किंवा त्यांच्याकडे असेल प्रमुख नेत्यांनी युतीधर्माची आचारसंहिता पाळली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना भाजप पाळेल. एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार आपल्या नेत्यांना सांगतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर