

रायगड, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील बोपेले रोड परिसरात गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका तरुण चालकाचा मृत्यू झाला. ही घटना मौजे मंगलमुर्ती निवास, साईनाका मंदिराजवळ घडली असून अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती हा पिंपळोली सुगवे (ता. कर्जत) येथील रहिवासी असून तो आपल्या ताब्यातील स्विफ्ट कार (क्र. एमएच-46 बीव्ही-0203) स्वतः चालवत नेरळकडून पिंपळोलीकडे जात होता. या दरम्यान, बोपेले रोडवरील मंगलमुर्ती निवास परिसरात पोहोचल्यावर त्याने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अविचाराने, हयगयीने व बेदरकारपणे वाहन चालविले. परिणामी, गाडीवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या बंद किराणा दुकानाच्या शटरला जोरात आदळली.
पहिला धक्का बसल्यानंतर गाडी काही अंतर पुढे गेली आणि पुन्हा एका पिलरला ठोकर मारत थांबली. या दुहेरी अपघातात चालक गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. अपघातामुळे किराणा दुकानाचे शटर, पिलर तसेच कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या घटनेबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७७/२०२५ नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब), १०६(१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघाताचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेंबडे हे करीत आहेत. पोलिसांनी अपघातस्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेने नेरळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके