
रत्नागिरी, 24 ऑक्टोबर, (हिं. स.) : चिपळूणची कन्या समृद्धी देवळेकर हिला महाराष्ट्रातील एकमेव फ्रीडायविंग प्रशिक्षक म्हणून नावलौकिक मिळाला आहे.
फ्रीडायविंग ही एक अनोखी जलक्रीडा आहे. त्यामध्ये कोणत्याही ऑक्सिजन सिलिंडरचा वापर न करता, फक्त एका श्वासावर खोल समुद्रात प्रवेश केला जातो. ही केवळ शारीरिक ताकदीची नाही, तर मानसिक स्थैर्य, आत्मनियंत्रण आणि निसर्गाशी एकरूप होण्याची एक साधना आहे. समृद्धी सध्या एका श्वासावर तब्बल १२० फुटांहून अधिक खोल डाइव्ह करू शकते आणि ४ मिनिटांहून अधिक वेळ श्वास रोखून ठेवू शकते. ही एक अतुलनीय आणि अत्यंत दुर्मिळ क्षमता आहे.
समृद्धी सुरुवातीला एक ट्रेनी पायलट होती. तिचे प्राथमिक शिक्षण चिपळूणमध्ये झाले. उच्च शिक्षणासाठी ती पुणे येथे गेली. तेथे पायलटचे शिक्षण घेत असताना तिला सोशल मीडियावरून फ्रीडायविंग या खेळाची माहिती मिळाली. त्यानंतर या खेळाकडे ती आकर्षित झाली. दोन वर्षांपूर्वी तिने या खेळाकडे लक्ष केंद्रित केले. अल्पकालावधीत ती या खेळात मान्यता मिळवणाऱ्यांपैकी भारतातील मोजक्या व्यक्तींमध्ये ती एक ठरली. समृद्धी आता प्रमाणित फ्रीडायविंग प्रशिक्षक बनली आहे.
भारतात या खेळाचे प्रशिक्षण देणारे चार प्रशिक्षक आहेत. त्यामध्ये एक समृद्धी आहे. हा खेळ खेळणारे भारतात केवळ ३० जण आहेत. तिने कुडाळ आणि मालदीवमध्ये शुभम पांडे यांच्याकडून या खेळाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमविण्यासाठी ती फिलिपिन्समध्ये गेली. तेथे आंतरराष्ट्रीय पातळीवर फ्रीडायविंग कोर्सेस व कार्यशाळा घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील डायव्हर्स ऑफ विंगोरीय यांच्यासोबत प्रशिक्षण देण्यासाठी दाखल झाली आहे. तिच्याकडे भारत आणि जगभरातून विद्यार्थी हा खेळ शिकण्यासाठी येतात. हा खेळ खेळताना खोल पाण्याशी एकरूप व्हावे लागते. श्वासावर नियंत्रण मिळवावे लागते. स्वतःच्या मर्यादा ओळखून त्याही पुढे जाण्यासाठी हा खेळ महत्त्वाचा आहे.
भारतात फ्रीडायविंग अजून फारसा माहित नाही, पण योग्य मार्गदर्शन व संधी मिळाल्यास आपण उत्कृष्ट फ्रीडायव्हर्स आणि प्रशिक्षकही घडवू शकतो. कारण भारतीयांमध्ये फ्रीडायविंगसाठी अपार क्षमता आहे. आपल्याकडे असलेली मानसिक शांतता, योगाभ्यासाची परंपरा, शारीरिक सहनशक्ती आणि आत्मनियंत्रण या सर्व गुणांमुळे आपण या खेळात जागतिक स्तरावर आघाडी घेऊ शकतो, असा विश्वास समृद्धी देवळेकर हिने व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी