
कोल्हापूर, 25 ऑक्टोबर, (हिं.स.)। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात संतापजनक घटना उघडकीस आली आहे. स्वतःच्या तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच धारदार शस्त्राचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा प्रकार उघड केला आहे. करवीर पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत.
या बाबत पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, करवीर तालुक्यातील एका गावात रहाणाऱ्या या नराधम बापाच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीची आई आणि दोन लहान मुले कोल्हापूर येथील एका उपनगरात वास्तव्याला होते. मुलीची आई भंगार गोळा करून मुलांचा सांभाळ करीत होती.
दिवाळी तोंडावर असल्याचे कारण पुढे करून नराधामाने तेरा वर्षाच्या मुलीला गावी नेले. आणि आपल्या घरात सायंकाळी साडेसात वाजता आणि पहाटे नराधमाने धारदार शस्त्राचा धाक दाखवून स्वतःच्या तेरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगीतला तर ठार मारण्याची धमकीही माथेफिरूने पीडित मुलीला दिली. मुलीने हा प्रकार आईला सांगीतला त्यांनी करवीर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे. सामाजिक संस्थांनीही या प्रकाराचा निषेध व्यक्त करून अल्पवयीन मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची मागणी केली आहे. करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून या नराधम बापला त्वरीत अटक करण्यात आली पो. नि. किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar