
नाशिक, 25 ऑक्टोबर, (हिं.स.) - जालना शहरात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या २४ वर्षीय युवकाचा खून करून फरार झालेला मुख्य आरोपी विशाल उर्फ वांग्या शिवाजी गायकवाड (२४, नि. लहुजी चौक, नुतन वसाहत, जालना) यास नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने नाशिकरोड रेल्वे स्थानकालगतच्या बस स्थानकातून ताब्यात घेतले. त्यास जालना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जालना येथील विकास प्रकाश लोंढे (२४, नि. लहुजी चौक, नुतन वसाहत) यास शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता जुन्या भांडणाची कुरापत काढुन रस्त्यात अडवण्यात आले. जातीवाचक शिवीगाळ करून रॉड, लाकडी दांडा व लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याचा खून करण्यात आला.
याप्रकरणी कदीम पोलीस ठाण्यात खून व अॅट्रासिटीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. यातील आरोपी फरार झाल्याने नजिकच्या जिल्ह्यातील पोलिसांना याबाबतची सूचना देण्यात आली होती.
नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकचे हवालदार प्रशांत मरकड यांना मुख्य आरोपी विशाल गायकवाड हा नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांना ही माहिती कळवल्यानंतर त्यांनी हवालदार मरकडसह सहकाऱ्यांना पाठवून सापळा शोध घेण्याचे आदेश दिले.
त्यानुसार हे पथक नाशिकरोड रेल्वे स्थानक तसेच लगतच्या बस स्थानक परिसरात शोध घेऊन आरोपी विशाल गायकवाड यास ताब्यात घेतले. नाशिक पोलिसांनी केलेल्या चौकशीत विशाल याने खुनाची कबुली दिली. त्यास जालना पोलिसांच्या 'एलसीबी' पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गु युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, पोउनि सुदाम सांगळे, पोहवा प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, देविदास ठाकरे, विशाल काठे, सुकाम पवार, पोअं जगेश्वर बोरसे, मपोअं अनुजा येलवे तसेच तांत्रिक विष्लेशनाचे सपोनि जया तारडे, पोहवा विशाल साबळे अशांनी केलेली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV