
परभणी, 25 ऑक्टोबर (हिं.स.)।
सेलू तालुक्यातील वालूर येथे घडलेल्या चोरी आणि खून प्रकरणी आता विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली असून, पोलिसांनी संशयित पाच आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती सेलू पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.
वालूर शिवारातील दोन वेगवेगळ्या शेतआखाड्यांवर चोरट्यांनी दरोडा टाकला. पहिल्या घटनेत चोरट्यांनी एका महिलेवर हल्ला करून तिच्या अंगावरील दागिने हिसकावून घेतले, तर दुसऱ्या ठिकाणी झोपेत असलेल्या संतोष सोनवणे (वय 23) या तरुणाचा लोखंडी रॉडने मारहाण करून खून केला. या दुहेरी घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेनंतर पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, उपविभागीय पोलिस अधिकारी दिपककुमार वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी तपासकामी पोलिसांना आवश्यक त्या सूचना देत आरोपींचा शोध वेगाने घेण्याचे आदेश दिले.
दरम्यान, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी संशयितांचे रेखाचित्र जारी केले असून, आरोपींची माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत संशयित पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे.
नागरिकांकडून कोणतीही संबंधित माहिती मिळाल्यास ती खालील क्रमांकावर कळविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे स्थानिक गुन्हा शाखा निरीक्षक विवेकानंद पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी दिपककुमार वाघमारे पोलिस निरीक्षक दिपक बोरसे
पोलिसांच्या तातडीच्या आणि समन्वयित कारवाईमुळे या गंभीर प्रकरणातील तपास गतीमान झाला असून, लवकरच गुन्ह्याचा उलगडा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis