गडचिरोलीत धानाची गंजी झाकताना कोसळली वीज; एकाचा मृत्यू
गडचिरोली, 25 ऑक्टोबर, (हिं.स.) कोरची तालुक्यातील केसालडाबरी येथे शेतात धानाच्या गंजीवर ताडपत्री झाकण्यासाठी गेलेल्या एका दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याचा वीज पडून मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. २५) दुपारी दीड वा
मृतक सरगम कोरचा


गडचिरोली, 25 ऑक्टोबर, (हिं.स.) कोरची तालुक्यातील केसालडाबरी येथे शेतात धानाच्या गंजीवर ताडपत्री झाकण्यासाठी गेलेल्या एका दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याचा वीज पडून मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. २५) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. मृत विद्यार्थ्याचे नाव सरगम सोमनाथ कोरचा (वय १७) असून, जखमी मुलाचे नाव योगेश घावळे (वय १७) आहे.

सरगम कोरचा हा मसेली येथील छत्रपती विद्यालयात शिकत होता. सध्या गडचिरोलीत धान कापणीचा हंगाम सुरू आहे. धानाची गंजी भिजण्यापासून वाचवण्यासाठी सरगम हा गोंदिया जिल्ह्यातील गुजूरबडगा येथील त्याचा नातेवाईक योगेश घावळे याच्यासह ताडपत्री झाकण्यासाठी गेला होता. पाऊस सुरू झाल्यामुळे दोघेही धानाच्या गंजीजवळ असलेल्या मोहाच्या झाडाखाली थांबले होते. याच वेळी अचानक झाडावर वीज कोसळल्याने सरगम आणि योगेश दोघेही खाली कोसळले. सरगमचे वडील सोमनाथ कोरचा यांनी तातडीने गावकऱ्यांच्या मदतीने दोघांनाही कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी सरगमला मृत घोषित केले.

जखमी योगेश घावळे याच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी चिचगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे केसालडाबरी आणि परिसरातील गावांमध्ये शोककळा पसरली असून, शासनाने सरगमच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande