रत्नागिरी : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिक्षण व्यवस्थेला आकार देणारे : प्रा. प्रभात कोकजे
रत्नागिरी, 25 ऑक्टोबर, (हिं. स.) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अभ्यासक्रमाचा विचार करता विद्यार्थ्यांचे वय, रुची या मुख्य गोष्टी विचारात घेऊन आराखडा बनवण्यात आला आहे. विद्यार्थी घडवत असताना, त्याला आवडत्या क्षेत्रातील शिक्षण सहजतेने घेण्याची सुविध
रत्नागिरी : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिक्षण व्यवस्थेला आकार देणारे : प्रा. प्रभात कोकजे


रत्नागिरी, 25 ऑक्टोबर, (हिं. स.) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अभ्यासक्रमाचा विचार करता विद्यार्थ्यांचे वय, रुची या मुख्य गोष्टी विचारात घेऊन आराखडा बनवण्यात आला आहे. विद्यार्थी घडवत असताना, त्याला आवडत्या क्षेत्रातील शिक्षण सहजतेने घेण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन, सुजाण नागरिक बनवणे आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्टदेखील आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे शिक्षण व्यवस्थेला खऱ्या अर्थाने आकार देणारे ठरेल, असा विश्वास गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रभात कोकजे यांनी व्यक्त केला.

वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणात सावर्डे येथे ते बोलत होते. जूनमध्ये रत्नागिरी येथील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणादरम्यान एका खासगी बसचा निवळी येथे मोठा अपघात झाला होता. प्रशिक्षणार्थ्यांच्या त्यामुळे या शिक्षकांना संबंधित प्रशिक्षणातून बाहेर पडावे लागले होते. या अपघाताची दखला आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी तात्काळ घेत या विषयाची माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली होती. त्यांनी त्याच वेळी संबंधित प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पुन्हा घेण्यात येईल,कोणतेही नुकसान होणार नाही असे आश्वासित केले होते. त्यालाच अनुसरून त्या शिक्षकांचे प्रशिक्षण चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्रशालेत डाएटतर्फे सुरू झाले आहे. यावेळी २५ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत.

त्यादरम्यान प्रा. कोकजे पुढे म्हणाले की,प्रत्येक शिक्षकाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करताना त्याचा आराखडा समजून घेण्याची गरज आहे.

आज विद्यार्थ्यांना अनावश्यक विषयदेखील घ्यावे लागतात व त्यात रुची नसतानाही त्याच्या परीक्षा देत पुढे सरकावे लागते. पण नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊनच, विषय निवडीचे स्वातंत्र्य असणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्र कायम ठेवण्यात आले असून, तंत्रज्ञानाधारित शिक्षण व अनुभवाधारित शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे. पारखद्वारे एकसमान मूल्यमापन व्यवस्थाही करण्यात आल्याचे कोकजे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचा बौद्धिक, सामाजिक, भावनिक, नैतिक, शारीरिक संपूर्ण विकास, बहुभाषिकता, कौशल्याधारित शिक्षण,कला, क्रीडा व संस्कृृतीचा समावेश असणे, सातत्यपूर्ण मूल्यमापन हे अभ्यासक्रमाचे प्रमुख घटक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. कोकजे यांनी अगदी सोप्या सहज भाषेत, दैनंदिन जीवनातील दाखले देत आपला विषय उपस्थित शिक्षकांना पटवून दिला.

डाएटच्या प्राचार्या श्रीमती नीता कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिव्याख्याते राजेंद्र लठ्ठे यांच्या उपस्थितीत हे प्रशिक्षण सुरू आहे. यावेळी सुलभक म्हणून प्रा. कोकजे, प्रा. सौ. मानसी गानू, सुधीर शिंदे काम पाहत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande