
रत्नागिरी, 25 ऑक्टोबर, (हिं. स.) : देवरूख येथे सरस्वती ॲकॅडमी आयोजित कलेचा उत्सव हा चित्रप्रदर्शन व कार्यशाळेचा उत्साहात आरंभ झाला. जागतिक कलाकार दिनाचे औचित्य साधुन चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
देवरूख येथील चित्रकार प्रवीण हर्डीकर, सुरेंद्र ऊर्फ भाऊ शिंदे, किशोर भाट्ये, दीक्षा सागवेकर यांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे प्रमुख उद्घाटक रत्नागिरीतील सुप्रसिद्ध कौन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट अमित सामंत आणि कला क्षेत्रातील सुप्रसिद्ध चित्रकार विष्णू परीट यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ललित कला ॲकॅडमीच्या प्राचार्या सौ. शिल्पा मुंगळे आणि सरस्वती ॲकॅडमीचे प्रभाकर सनगरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
चित्रप्रदर्शन २७ ऑक्टोबरपर्यंत दररोज सकाळी ९.०० ते १.३० आणि सायंकाळी ४.०० ते ८.०० या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. तसेच दुपारी १.३० ते ४.०० या वेळेत चित्रकला कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
उद्घाटनप्रसंगी सुप्रसिद्ध चित्रकार विष्णू परीट यांनी सांगितले की, कला जिवंत ठेवण्यासाठी कलाकारांनी सातत्याने सराव करणे आणि विविध प्रदर्शनांना भेट देणे अत्यावश्यक आहे. देवरूखसारख्या छोट्या शहरात असे कलाकार घडत आहेत. त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
अमित सामंत यांनी सांगितले की, “कला ही मनःशांती व थेरपीचे काम करते.कलाकृतीचे नीट निरीक्षण करुन कलाकाराची दृष्टी समजून घेतली पाहिजे. ललित कला ॲकॅडमीच्या सौ. शिल्पा मुंगळे यांनी कलाकारांना संदेश देताना म्हटले की, “प्रत्येक कलाकाराने कलेचा निखळ आनंद घ्यावा,तो इतरांपर्यत पोहोचवण्याचे काम ही चित्रे करतात.
बालकलाकार कार्यशाळेतही मुलांनी उत्साही सहभाग नोंदवला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी