रत्नागिरीत ७ ते ९ नोव्हेंबरला सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी उपक्रम
रत्नागिरी, 25 ऑक्टोबर, (हिं. स.) : राज्य मराठी विकास संस्था प्रायोजित आणि आर्ट सर्कल आयोजित सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी उपक्रम ७ ते ९ नोव्हेंबर या काळात होणार आहे. रत्नागिरीची कन्या असलेल्या सुनीता ठाकूर अर्थात सुनीताबाई देशपांडे अत्यंत प्रतिभा
सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी


रत्नागिरी, 25 ऑक्टोबर, (हिं. स.) : राज्य मराठी विकास संस्था प्रायोजित आणि आर्ट सर्कल आयोजित सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी उपक्रम ७ ते ९ नोव्हेंबर या काळात होणार आहे.

रत्नागिरीची कन्या असलेल्या सुनीता ठाकूर अर्थात सुनीताबाई देशपांडे अत्यंत प्रतिभावान साहित्यिक होत्या. ‘आहे मनोहर तरी’ सारखे आत्मकथानात्मक पुस्तक, ‘समांतर जीवन’सारखे वैचारिक तर ‘मण्यांची माळ’, ‘मनातलं अवकाश’, ‘सोयरे सकळ’ ही ललित लेखांची पुस्तके आणि ‘प्रिय जी. ए.’ यासारखे पत्रलेखन ही त्यांची सगळी पुस्तके म्हणजे मराठी साहित्यातील अनमोल ठेवा आहे. त्यांचा परिपूर्णतेचा ध्यास, कवितेची प्रचंड आवड, काटकसरीने संसार करत लाखोंच्या दिलेल्या देणग्या हे पैलू सर्वसामान्यांना अचंबित करणारे आहेत. पु.लं.ची सखी आणि सचिव या दोन्ही भूमिका त्यांनी अत्यंत कर्तबगारीने, धडाडीने आणि त्याचवेळी मातृहृदयाने पार पाडल्या.

सुनीताबाईंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य मराठी विकास संस्थेच्या आर्थिक सहाय्याने आर्ट सर्कलच्या वतीने हा तीन दिवसीय उपक्रम साकारणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम रत्नागिरीत होण्यासाठी उद्योगमंत्री व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.शामकांत देवरे यांचेही सहकार्य लाभले आहे.

या कार्यक्रमात दिनांक 7 रोजी दिवसभर शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटासाठी कवितावाचन स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्याला शुभांगी दामले यांची उद्घाटक म्हणून उपस्थिती राहणार असून, त्या अभिवाचनदेखील करणार आहेत. संध्याकाळी पु. ल. देशपांडे लिखित मॅड सखाराम आणि आणि त्याच्याच जोडीने त्यांच्या साहित्यावर आधारित ‘मराठी साहित्याचा घोळीव इतिहास’ हे दोन दीर्घांक होणार आहेत.

दिनांक 8 रोजी दिवसभर शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटांसाठी अभिवाचन स्पर्धा होणार आहे. सायंकाळी सुनीताबाई आणि जी. ए. कुलकर्णी यांच्या पत्रांवर आधारित ‘रुंग्ली रुंग्लीयॉट’ हा अभिवाचन कार्यक्रम सुप्रसिद्ध लेखिका, गायिका माधुरी पुरंदरे आणि गिरीश कुलकर्णी सादर करणार आहेत. याचे दिग्दर्शन प्रथितयश दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी केले आहे.

रविवार, 9 नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवस कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. त्यामध्ये सुनीताबाईंच्या साहित्याचा मागोवा घेणारे चर्चासत्र, मान्यवरांची भाषणे, काव्यवाचन यांचा समावेश असेल. या दिवसभराच्या कार्यक्रमात लेखिका मंगला गोडबोले, दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत, लेखक प्रवीण बांदेकर, संगीतकार कौशल इनामदार, कवी-लेखक किरण येले, कवी वैभव जोशी, लेखिका रेखा इनामदार – साने, अनुवादक नीता कुलकर्णी तसेच ठाकूर आणि देशपांडे कुटुंबातील सदस्य अशा मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

या सोहळ्यादरम्यान दिवस पुस्तक प्रदर्शन असेल. त्याचप्रमाणे आहे मनोहर तरी या पुस्तकाचे मुखपृष्ठकार सुप्रसिद्ध चित्रकार बाळ ठाकूर यांचे पुस्तकांच्या मुखपृष्ठचित्रांचे प्रदर्शनही या तीन दिवसांदरम्यान रसिकांसाठी खुले होणार आहे. रसिकांनी या सर्व सोहळ्याचा आनंद घ्यावा आणि रत्नागिरीच्या या प्रतिभावान कन्येला आदरांजली अर्पण करावी, अशी विनंती आर्ट सर्कलने मराठी भाषा विकास संस्थेच्या वतीने केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande