
नाशिक, 25 ऑक्टोबर (हिं.स.)। पोलीस ठाण्यात केलेली केस मागे घेतली नाही, तर बंदुकीने मारून टाकण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कामाच्या ठिकाणी जात होती. त्यावेळी आरोपी सनी राजू धोत्रे व त्यांचा भाऊ आकाश राजू धोत्रे (रा. जनार्दननगर, नांदूर नाका) यांनी एका मोटारसायकलीने फिर्यादीच्या पाठीमागून येऊन पीडितेचा रस्ता अडविला. तू आणि तुझ्या तुझ्या आईने केली केस मागे घे. नाही तर तुझे खानदान संपवून टाकीन व तुला कुठेही काम करू देणार नाही. मी चांगल्या चांगल्यांना संपविले आहे, तू खालच्या जातीची आहेस, असे म्हणून आरोपीने कमरेला खोचलेली पिस्तुलासारखी वस्तू दाखवून तू दोन दिवसांमध्ये केस मागे घेतली नाही, तर याच बंदुकीने तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली. यावेळी भीतीमुळे पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आरोपी धोत्रे बंधूंनी तिचा हात ओढून लज्जास्पद कृत्यू करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात विनयभंगासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमांन्वये धोत्रे बंधूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV