
परभणी, 28 ऑक्टोबर (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनतर्फे पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात झालेल्या 34व्या राज्य अजिंक्यपद आणि 87व्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत परभणीच्या अद्या बाहेती हिने दुहेरी मुकुट पटकावत परभणीचा झेंडा राज्यस्तरावर फडकावला.
अद्या बाहेती ही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. तिने या स्पर्धेत अकरा वर्षे मुलींच्या गटात मुंबईच्या स्वरा गुडे हिला 3-0 अशा सरळ सेटमध्ये पराभूत करत राज्य अजिंक्यपद पटकावले. तर पंधरा वर्षे मुलींच्या गटात पुण्याच्या नायशा रेवास्कर हिला 3-0 अशा विजयाने नमवून दुसरे राज्य अजिंक्यपद मिळवले.
या यशासोबत अद्याने पंधरा वर्षे मुलींच्या सांघिक गटाचे नेतृत्व करत परभणी जिल्ह्यास कांस्यपदक मिळवून दिले. या संघात शरयू टेकाळे, कल्याणी सवंडकर आणि स्वरनिका पाटील या खेळाडूंचा समावेश होता. त्यामुळे अद्याने या स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक कांस्य असे तीन पदक आपल्या नावे केले.
अद्याच्या या उज्वल कामगिरीबद्दल राज्य अध्यक्ष प्रवीण लुकंड, राज्य सरचिटणीस यतिन टिपणीस, राज्य कोषाध्यक्ष संजय कडू, जिल्हा अध्यक्ष समशेर भैया वरपुडकर, कार्याध्यक्ष माधव शेजुळ, सचिव गणेश माळवे, सहसचिव ज्ञानेश्वर पंडित, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे, क्रीडा अधिकारी सुयश नाटकर, रोहन औंढेकर, तालुका क्रीडा अधिकारी कल्याण पोळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis