शासनाने सर्वसामान्यांच्या बाजूने उभे राहावे – प्रकाश आंबेडकर
परभणी, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्यभरात पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने जाहीर केलेली ३१ हजार कोटी रुपयांची मदत ही वास्तवापेक्षा केवळ मटक्याचा आकडा वाटतो. सरकारने सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या बाजूने उभे रा
शासनाने सर्वसामान्यांच्या बाजूने उभे राहावे – अँड. प्रकाश आंबेडकर


परभणी, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्यभरात पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने जाहीर केलेली ३१ हजार कोटी रुपयांची मदत ही वास्तवापेक्षा केवळ मटक्याचा आकडा वाटतो. सरकारने सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे,” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

ते परभणी जिल्हा दौऱ्यावर आले असता येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पक्षाचे अशोक सोनवणे, फारूक अहमद, प्रा. नागोराव पांचाळ, जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे, मनोहर वावळे, महानगराध्यक्ष मुद्दसीर असरार, संदीप खाडे आदी उपस्थित होते.

अँड. आंबेडकर म्हणाले की, “अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. ओल्या व कोरड्या दुष्काळाच्या काळात जशी खावटी वाटप योजना केली जाते, तशी यंदा करण्यात आली नाही. दिवाळीपूर्वी मदत मिळणे आवश्यक होते, मात्र ती न मिळाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारची तिजोरी ही जनतेची आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ मदत जाहीर करून सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहावे.” राज्यातील वाढत्या गुन्हेगारी आणि महिला अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख करताना त्यांनी सरकारवर तीव्र टीका केली. “आज पोलिस खाते हे बदमाशांचे खाते झाले आहे,” असा आरोप त्यांनी यावेळी केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांबाबत ते म्हणाले की, “महाराष्ट्रातील निवडणुका या बिहार विधानसभेच्या निकालावर अवलंबून आहेत. बिहारचा निकाल विरोधात गेला तर महाराष्ट्रात निवडणुका होतील का, हा मोठा प्रश्न आहे.” मतदार यादीत सुरू असलेल्या गोंधळाबाबत त्यांनी आरोप केला की, “शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्ष मतदार यादीतील फेरफार करून फसवणूक करत आहेत. निवडणूक आयोगाला खिंडीत पकडता येईल असे मुद्दे सोडले जात आहेत, ज्यामुळे भारतीय जनता पक्षाला थेट फायदा होत आहे,” अशी टीका आंबेडकर यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande