
अकोला, 28 ऑक्टोबर (हिं.स.) : आपल्या गावात बालविवाह होऊ न देण्याची शपथ विविध ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य, ग्रामस्थ यांनी महिला व बालविकास विभागातर्फे विविध ठिकाणी आयोजित कार्यशाळांत घेतली.
बालविवाह मुक्त महाराष्ट्र संकल्प अभियानात १०० दिवसांचा कृती कार्यक्रम राबविण्यात येत असून, गावोगाव जनजागृती होत आहे. महिला व बालविकास कार्यालय, तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत अकोला, बार्शीटाकळी, पातूर, मुर्तिजापूर या तालुक्यांतील ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य सचिव, अंगणवाडी सेविका व पोलीस पाटील आणि आशा सेविका यांच्या प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या. यावेळी ग्राम समितीचे सदस्य व ग्रामस्थांनी गावात बालविवाह होऊ न देण्याबाबत प्रतिज्ञा घेतली.
प्रशिक्षण कार्यशाळेत बालकांचे हक्क कायदे, बालविवाह अधिनियम, बाल लैंगिक अत्याचार अधिनियम, बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम, तसेच ग्राम बाल संरक्षण समितीची रचना कार्य याबाबत माहिती देण्यात आली. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी सदस्य ॲड. संजय सेंगर, यशदाचे प्रशिक्षक अनिल राऊत व संतोष चक्रनारायण यानी सविस्तर मार्गदर्शन व उपस्थितांचे शंकानिरसन केले.
जिल्हा बाल संरक्षण कक्ष,चाइल्ड हेल्प लाईन,सुखाय फाऊंडेशन, एन्करेज एज्युकेशनल फाऊंडेशन, विप्ला फाऊंडेशन यांचे उपक्रमाला सहकार्य लाभले. गावामध्ये बालविवाह होत असल्यास किंवा अठरा वर्षाच्या आतील मुला-मुलींबाबत काही अन्याय होत असल्यास तात्काळ 1098 चाईल्ड लाईन, किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
विभागाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात विवीध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे