
कचाट्यात सापडल्याने नागरिक, रुग्ण आणि प्रवासी बेहाल
नागपूर, 28 ऑक्टोबर (हिं.स.): विविध मागण्यांसाठी शेतकरी नेता बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या शेतकरी मोर्चामुळे आज नागपूर- वर्धा मार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली. दुपारपासून रात्रीपर्यंत रांगेत अडकलेल्या हजारो वाहनांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अनेक प्रवासी, विद्यार्थी, वृद्ध आणि रुग्णवाहिकादेखील या कोंडीत अडकल्या.
वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सकाळपासूनच ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारले होते आणि नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. तरीदेखील दुपारी दोनपर्यंत वाहतूक सुरळीत होती. मात्र, दुपारनंतर वर्धा येथून निघालेल्या शेतकरी मोर्चाने बुटीबोरीकडे प्रस्थान केले आणि त्यानंतर वर्धा मार्गावरील वाहतूक ठप्प होऊ लागली.सुमारे चार वाजताच्या सुमारास कापूस संशोधन केंद्राजवळील ठिय्या आंदोलनामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. काही मिनिटांतच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि बुटीबोरीपासून जामठ्यापर्यंत मार्ग जाम झाला. आंदोलक समृद्धी महामार्गावर पोहोचू नयेत म्हणून पोलिसांनी त्या मार्गाचे सर्व प्रवेशबिंदू बंद केले होते.त्यामुळे वर्धा, चंद्रपूर, हैदराबाद या दिशेने जाणारी तसेच तेथून नागपुरात येणारी सर्व वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. अनेक प्रवाशांना खाजगी बसमधून उतरून पायीच शहरात यावे लागले. नागरिकांकडून “आंदोलन करा, पण सामान्यांना त्रास का?” असा संतप्त प्रश्न उपस्थित करण्यात आला.विशेष म्हणजे, काही रुग्णवाहिकादेखील कोंडीत अडकल्या, त्यामुळे रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने या वाहनांना दीर्घकाळ थांबावे लागले.दरम्यान, पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त फौज तैनात केली असून रात्री उशिरापर्यंत मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू होते.-------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी