
रायगड, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत चंद्रयान ३ महिला प्रभाग संघ, चेंढरे यांची वार्षिक सर्वसाधारण सभा वाडगाव येथे उत्साहात पार पडली. या सभेस विविध ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी, तालुका व जिल्हास्तरीय अधिकारी तसेच मोठ्या संख्येने स्वयंसहायता गटातील महिला उपस्थित होत्या.
सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभाग संघ अध्यक्ष होत्या. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी पंचायत समिती सदस्य जुईली पाटील, जिल्हा अभियान व्यवस्थापक शिरीष पाटील (रायगड-अलिबाग), माधुरी जाधव (DM IBCB), सुजाता पाटील (DM FI), तसेच ग्रामपंचायत वाडगाव सरपंच सारिका पवार, तालुका अभियान व्यवस्थापक रिद्धी आवळे, प्रभाग समन्वयक साईनाथ पाटील, गणेश मस्के, सोनम पवार, अमोल माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. सचिवांनी वार्षिक अहवाल सादर केला व वर्षभरातील उपक्रमांचा आढावा घेतला. शिरीष पाटील यांनी प्रभाग संघाच्या आगामी नियोजनावर मार्गदर्शन करत प्रत्येक महिलेला स्वावलंबी होण्यासाठी उद्योगधंद्यात उतरावे, असे आवाहन केले. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा याची माहिती दिली.
तालुका अभियान व्यवस्थापक रिद्धी आवळे यांनी महिलांना आत्मनिर्भरतेचे व सक्षमीकरणाचे महत्त्व पटवून दिले. महिलांनी एकत्र येऊन प्रभाग संघ मजबूत करावा, अशी प्रेरणा त्यांनी दिली. सभेचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला. एकंदरीत, चंद्रयान ३ महिला प्रभाग संघाची ही सभा महिलांच्या एकजुटीचा व प्रगतीच्या नव्या वाटचालीचा प्रतीक ठरली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके