
रायगड, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। रोहा तालुक्यातील चणेरा विभागात राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडून आला आहे. अनेक वर्षांपासून शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा मजबूत बालेकिल्ला मानला जाणारा हा विभाग आता शिवसेना (शिंदेगट) कडे झुकत आहे. उद्देश वाडकर यांच्या नेतृत्वाखाली गाव वाड्यातील असंख्य नागरिकांनी शिवसेना (शिंदेगटात) प्रवेश केला असून, या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
चणेरा विभागातील नागरिकांनी अनेक वर्षांपासून रस्ते, जलजीवन मिशन, मंदिरे, बेरोजगारी, स्वच्छता आणि ट्रान्सफॉर्मर यांसारख्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. यामुळे नाराज नागरिकांनी विकासाच्या आशेने शिवसेना (शिंदेगट)चा झेंडा हाती घेतला आहे.अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या उपस्थितीत खांबेरे आणि बोबडघर येथील कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी उपतालुका प्रमुख व माजी सभापती उद्देश वाडकर, चणेरा विभाग प्रमुख गैनिनाथ कटोरे, संपर्कप्रमुख संजीवनी नाईक, जेष्ठ शिवसैनिक मोतीराम गीजे, सीएम ठाकूर तसेच युवासेना तालुका प्रमुख ऍड. अविनाश भगत आणि ऍड. मयुरा मोरे उपस्थित होते.शिवसेना (शिंदेगट)ने चणेरा विभागात आक्रमक रणनिती स्वीकारली असून, आमदार दळवी यांनी स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर सोपवली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी झालेला हा मोठा प्रवेश शेकाप व राष्ट्रवादी गटासाठी निश्चितच मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके