
नाशिक, 28 ऑक्टोबर (हिं.स.) जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीपिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यामध्ये १९ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत हजेरी लावलेल्या पावसामुळे ४८ हजार ३२४ हेक्टरवरील पिके पाण्यात गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मका, सोयाबीन, भात, कांदा पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे १ लाख ८ हजार ५३१ शेतकरी बाधित झाले आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने यंत्रणांना पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत.सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या बँकखात्यावर वर्गही झालेली नसताना पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रातील कमीदाबाच्या पट्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडतो आहे. या पावसाने नाशिक जिल्ह्याला तडाखा दिला आहे. जिल्ह्यातील ९०१ गावांमधील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका मका पिकाला बसला आहे. तब्बल १८ हजार ५५८ हेक्टरवरील मका पिक पाण्यात गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याशिवाय १२ हजार ७९३ हेक्टर कांदा, ११७९७ हेक्टरवरील भातपिक, १६४२ हेक्टरवरील मका, १३०३ हेक्टरवरील कांदा रोपवाटिका, १३२३ हेक्टरवरील द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच बाजरी, भाजीपाला, टोमॅटो, डाळींबालाही पावसाने तडाखा दिला आहे.जिल्हा प्रशासन बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करीत आहे. त्यासाठी कृषी विभागाचे सहकार्य घेतले जात आहे. परंतु, सध्या पावसाचा जोर कायम आहे. त्यातही अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचून राहिले असल्याने पंचनामे करण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे अंतिमत: पंचनाम्यांमध्ये नुकसानीची आकडे वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अवकाळीचे प्राथमिक नुकसानबाधित गावे : ९०१बाधित शेतकरी : १०८५३१जिरायत क्षेत्र : ३२०५८ हेक्टरबागायत क्षेत्र :१४६४४ हेक्टरबहुवार्षिक फळपिक : १६२३ हेक्टर
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV