
मुंबई, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्यातील लोककलावंताच्या जतन,संवर्धन व प्रमाणितीकरण, संहितीकरणासाठी स्वतंत्र समिती सांस्कृतिक कार्य विभागातंर्गत स्थापन करु, अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज दिली.
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज लोककलावंतासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे याबाबत बैठक झाली. या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांच्यासह लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, गायक नंदेश उमप, अभिनेते सुशांत शेलार आणि संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते.
उपस्थितांकडून याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सांस्कृतिक मंत्री ॲड आशिष शेलार यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले, की, याबाबत झालेली चर्चा आणि एकुणच विषयाची व्याप्ती अधिक असल्याचे लक्षात घेता, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अंतर्गत एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येईल, व त्या समितीचे सदस्य ही लवकरच आम्ही घोषित करु असे मंत्री शेलार यांनी यावेळी सांगितले.
लोककला, लोककलावंत, लोककलाकार, लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती यांचे संपूर्ण संवर्धन व प्रमाणिकीकरण होणे आवश्यक आहे. तसेच या सर्व क्षेत्रांचे डिजिटलायझेशन, लोककलांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण घटकांपासून ते पारंपरिक वाद्यांपर्यंतच्या सर्व वस्तूंचे संवर्धन व जतन करण्याची आवश्यकता व या कलांचे संवर्धन करून त्या संग्रहालयांमध्ये प्रदर्शित करणे, तसेच प्रत्येक तालुका आणि जिल्हास्तरावर लोककलेचे कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त झाले.
या सर्व गोष्टींचा सखोल विचार करून सांस्कृतिक धोरणाच्या भाग म्हणून या उपक्रमांना मूर्त रूप देण्यासाठी समिती स्थापन करून ही समिती एका महिन्यात अहवाल तयार करेल, त्यानंतर पुढील कार्यवाहीची दिशा ठरवली जाईल, असा निर्णय मंत्री शेलार यांनी घोषित केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर