
मुंबई, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांनी मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर वेगळी ओळख दिली. वस्त्रहरण या नाटकाने त्यांनी मालवणी भाषा वेगळी उंचीवर नेऊन ठेवली. गवाणकर यांच्या निधनाने मराठी रंगभूमी एका ज्येष्ठ व श्रेष्ठ लेखकाला मुकली, अशा शोकभावन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
गंगाराम गवाणकर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून सपकाळ म्हणाले की, गवाणकर यांनी नोकरी करत करत आपल्या नाट्यलेखनाची आवड जोपासली. १९७१ मध्ये त्यांनी रंगभूमीवरील कारकिर्दीला सुरुवात केली. ‘वरपरीक्षा’, ‘दोघी’, ‘वर भेटू नका’, ‘वेडी माणसे’ या नाटकांचे लेखन त्यांनी केले आहे. ‘दोघी’ हे नाटक त्यांनी काळाच्या पुढचा विचार करून लिहिले होते. ‘वस्त्रहरण’, वात्रट मेले, वन रुम किचन, उषःकाल होता होता, चित्रांगदा, ही विविध आषयांची नाटके त्यांनी लिहिली. वस्त्रहरण नाटकाने मालवणी भाषा सातासमुद्रापार पोहचवली आणि मच्छिंद्र कांबळी यांच्यासारखा दर्जेदार अभिनेता रंगभूमीला मिळाला. वस्त्रहरण या नाटकाचे पाच हजारांपेक्षा जास्त प्रयोग झाले तर वात्रट मेले नाटकाचे अडीच हजारांपेक्षा जास्त प्रयोग झाले आहेत.
गंगाराम गवाणकर यांनी ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते तसेच त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गंगाराम गवाणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर