
मुंबई, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। 'सन मराठी'वर 'मी संसार माझा रेखिते' या मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर व अभिनेता हरीश दुधाडे मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. याचसह मालिकेत इतर उत्कृष्ट कलाकार दिसून येत आहेत. येत्या १ डिसेंबर पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेत हरीश दुधाडे अविनाश हे पात्र साकारत आहे. अविनाशचा स्वभाव हा हुकूमशाही प्रवृत्तीचा, स्वार्थी आणि प्रत्येक चुकीसाठी अनुप्रियाला जबाबदार धरणारा आहे. अविनाशचा आपल्या कुटुंबाशी नक्की असा का वागत असावा? याबाबत अविनाशची बाजू काय असेल? हे पाहणं रंजक ठरणार आहे. 'जोडायचं ठरवलं तर सगळं जोडता येतं' या सुंदर तत्त्वावर मालिका आधारित आहे. प्रोमो ला मिळालेला प्रतिसाद पाहून मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी खात्री वाटते.
मालिकेत मुख्य अभिनेत्याची भूमिका हरीश दुधाडे साकारत आहे. अविनाश या भूमिकेविषयी सांगताना हरीश म्हणाले की, आतापर्यंत मी अशी भूमिका साकारली नव्हती. मला प्रेक्षकांनी नेहमीच सकारात्मक भूमिकेत पाहिलं आहे. त्यामुळे प्रोमो पाहून संमिश्र प्रतिसाद मिळाला. अविनाश बद्दल सांगायचं झालं तर तो नकारात्मक नाहीये. लहानपणापासून झालेले संस्कार, पुरुषप्रदान संस्कृतीला दिलेल महत्त्व यापुढेही परिस्थिती, डोक्यावर असलेलं कर्ज या सगळ्या गोष्टीने तो थोडा त्रासलेला आहे. म्हणूनच त्याचं वागणं इतरांना खटकतं पण तो त्याच्या कुटुंबावरही तितकंच प्रेम करतो. प्रेक्षकांना माझ्या या भूमिकेचा नक्कीच राग येऊ शकतो आणि त्यासाठी मी तयार आहे. कारण तीच माझ्या कामाची पोचपावती असेल. कधी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित होतोय ही उत्सुकता लागली आहे. प्रोमो पाहून कुटुंबातही आनंदाचं वातावरण आहे. मी घरात कधीच कोणावर चिडत नाही. हसतं खेळतं वातावरण मला खूप आवडत. एकंदरीतच अविनाश आणि मी पूर्णपणे वेगळा असल्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे. मालिकेतील माझे इतर सहकलाकार खूप भन्नाट आहेत. आम्ही सगळेचजण १ डिसेंबरची वाट पाहत आहोत. आतापर्यंत प्रेक्षकांनी प्रत्येक पात्राला खूप प्रेम दिलं यापुढेही हे प्रेम, आशीर्वाद कायम राहूदे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर