
मुंबई, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। भावनिक प्रामाणिकता, मानवी नात्यांची सूक्ष्म मांडणी आणि स्पष्ट बोलण्याच्या स्वभावासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक आनंद एल. राय लवकरच नवीन चित्रपटासह प्रेक्षकांसमोर येत आहेत. धनुष आणि कृति सेनन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘तेरे इश्क में’ हा चित्रपट 28 नोव्हेंबर रोजी हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत एकाचवेळी प्रदर्शित होणार आहे. रिलीजची तयारी सुरू असताना, आनंद राय यांनी त्यांच्या बदलत्या सर्जनशील दृष्टिकोनाविषयी मोकळेपणाने बोललं.
“मी बदललो तसा माझ्या कथा सांगण्याचा दृष्टीकोनही बदलला”
वर्षानुवर्षांच्या प्रवासात आनंद राय यांची पात्रं, नाती आणि त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी विकसित झाली आहे. ते मान्य करतात की काळानुसार त्यांच्या विचारांमध्ये बदल घडला आहे. ते म्हणतात, “जर मी बदलत आहे, तर माझ्या प्रेक्षकांनीही माझ्यासोबत बदलायला हवं. एखादी जुनी गोष्ट नव्या दृष्टीकोनाने सांगण्यास मला कधीच भीती वाटत नाही. बराच काळ पुरुष–स्त्री नात्यांकडे समानतेने पाहिलं गेलंच नाही—ही माझी मोठी शिकवण आहे. ‘तनु वेड्स मनु’ किंवा ‘रांझणा’च्या वेळी मी असं विचारत नव्हतो, पण आता विचारतो.”*
यशाचं ओझं कथा बदलून टाकतं
आनंद राय स्पष्टपणे सांगतात की, यशाच्या अपेक्षा अनेकदा कथाकथनाचा साधेपणा हिरावून घेतात. ते म्हणतात, “जेव्हा मी कथा सांगताना निर्भय होतो आणि फक्त तिला प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा सर्व काही व्यवस्थित होतं.
मुळांशी जोडणं आवश्यक
दिग्दर्शक पुढे सांगतात, “जमिनीवर राहणं खूप महत्त्वाचं आहे. कधी कधी माझी जमीन सुटते आणि मला ती पुन्हा पकडावी लागते. मी माझ्या पेंटहाऊसमध्ये जातो आणि स्वतःलाच आठवण करून देतो—तू तोच दिल्लीचा मुलगा आहेस, तुझं अर्ध आयुष्य त्या पिवळ्या घरांत गेलंय. तुझ्या कथा तिथेच आहेत, मग तू तसं का विचारत नाहीयस?”
प्रदर्शनाची तारीख जवळ येताना आनंद राय यांच्या या विचारांमधून स्पष्ट होतं की ‘तेरे इश्क में’ हा फक्त एक चित्रपट नाही, तर त्यांच्या नव्या समजुतीचा आणि जुन्या, जमिनीशी जोडलेल्या भावविश्वाचा संगम आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर