दिव्यांगांसाठी मेट्रो प्रवास 100% मोफत करण्याची आठवले यांची मागणी
मुंबई, 22 नोव्हेंबर, (हिं.स.)। मुंबई मेट्रोमध्ये दिव्यांग प्रवाशांना केवळ २५ टक्के सवलत मिळत असल्याने त्यांचा आर्थिक आणि दैनंदिन प्रवासाचा ताण वाढत असल्याचे लक्षात घेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला तातडीने निर
दिव्यांगांसाठी मेट्रो प्रवास 100% मोफत करण्याची आठवले यांची मागणी


मुंबई, 22 नोव्हेंबर, (हिं.स.)। मुंबई मेट्रोमध्ये दिव्यांग प्रवाशांना केवळ २५ टक्के सवलत मिळत असल्याने त्यांचा आर्थिक आणि दैनंदिन प्रवासाचा ताण वाढत असल्याचे लक्षात घेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. वरिष्ठ पत्रकार आणि दिव्यांग कार्यकर्ते दिपक कैतके यांनी मांडलेल्या मागणीला पूर्णपणे समर्थन देत आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत अधिकृत पत्र पाठवले आहे.

या पत्रात आठवले म्हणतात की, दिव्यांग प्रवाशांना आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने आणि त्यांना मेट्रो हा सुटसुटीत, सुरक्षित आणि नेमक्या वेळी पोहोचणारा प्रवासमार्ग असल्याने, मेट्रो प्रवासावर १००% मोफत सुविधा देणे अत्यावश्यक आहे. राज्य सरकारने विविध स्तरावर दिव्यांगांसाठी अनेक योजना सुरू केल्या असल्या, तरी मेट्रोमधील मोफत प्रवास सुविधा हा त्यांच्या दैनंदिन जगण्याशी निगडित मोठा दिलासा ठरू शकतो, असेही त्यांनी नमूद केले आहे.

मंत्री आठवले यांच्या हस्तक्षेपामुळे आता या मुद्द्याकडे राज्य शासनाचे लक्ष अधिक वेगाने वळण्याची शक्यता आहे. दिव्यांग यांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेले वरिष्ठ पत्रकार दिपक कैतके यांनी मागील काही दिवसांपासून ही मागणी सातत्याने पुढे मांडली होती. मुंबईसह महानगरातील वाढत्या मेट्रो नेटवर्कमुळे हजारो दिव्यांग प्रवाशांना रोजच्या प्रवासाचा मोठा खर्च सहन करावा लागतो. त्यामुळे मेट्रोमधील १००% सवलत ही त्यांच्यासाठी उपकारक ठरणार असल्याचे आठवले यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारकडून मिळालेला हा जोरदार पाठिंबा महत्त्वाचा ठरत असून, आता मुख्यमंत्री फडणवीस या मागणीवर किती वेगाने निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande